तुटवडा अन्‌ कालबाह्यता; रेमडेसिव्हिरचे गणित उलगडेना !  - Scarcity and obsolescence; Remdesivir's maths unraveled! | Politics Marathi News - Sarkarnama

तुटवडा अन्‌ कालबाह्यता; रेमडेसिव्हिरचे गणित उलगडेना ! 

मुरलीधर कराळे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

जिवाभावाचा माणूस डोळ्यासमोर तडफडताना कुणीच पाहू शकत नाही. त्यामुळेच जादा दरानेच काय; प्रसंगी लाखो रुपये मोजूनही हे इंजेक्‍शन खरेदी होईल, यात शंका नाही.

नगर :  रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा अन्‌ काळाबाजार सध्या राज्यभर गाजत आहे. एकीकडे जादा दराने विक्री होतेय, तर दुसरीकडे कालबाह्य झालेली इंजेक्‍शन रुग्णांना दिली जात आहेत. त्यावर नवे लेबल लावून विक्री होत आहे. हा काय प्रकार आहे? रेमडेसिव्हिरचा तुटवडा आहे, तर ही इंजेक्‍शन कालबाह्य झालीच कशी? याचाच अर्थ, काही साठेबाजांनी साठा करून ठेवला की काय, अशा शंकेला वाव आहे.

जिवाभावाचा माणूस डोळ्यासमोर तडफडताना कुणीच पाहू शकत नाही. त्यामुळेच जादा दरानेच काय; प्रसंगी लाखो रुपये मोजूनही हे इंजेक्‍शन खरेदी होईल, यात शंका नाही. मात्र, साठेबाजांना, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना आवरलेच पाहिजे. 

सध्या प्रत्येक जिल्ह्यात या इंजेक्‍शनच्या तुटवड्यामुळे उपचारांना उशीर होत आहे. त्यामुळे धोका वाढतो. आधीच रुग्णांची ससेहोलपट होते. दोन दिवसांपूर्वी ऑक्‍सिजनअभावी रुग्णालयाच्या दारात एकाने प्राण सोडला. रुग्णांना बेड मिळेना. मृत्यूनंतरही साडेसाती संपेना. स्मशानभूमीतील धगधग गांभीर्याची जाणीव करून देते. भंडारा जिल्ह्यातील कचरखेडा येथे कोरोना रुग्णाचे अर्धवट जळालेले मृतदेह कुत्र्यांनी लचके तोडून गावात आणले. याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित यंत्रणेला धारेवर धरले. रुग्णांचे हाल सुन्न करणारे आहेत. 

शुभेच्छा नव्हे, श्रद्धांजली 

गुढी पाडव्याच्या दिवशी सोशल मीडियावरील बहुतेक ग्रुपवर शुभेच्छा संदेशांचा पाऊस पडतो. या वर्षी चित्र वेगळे होते. अनेकांच्या घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तर कुणाचे छत्रच हरपले. गेल्या वर्षभरापासून बहुतेक कुटुंबांतील व्यक्ती कोरोना बळी ठरल्या. त्यामुळे या वर्षीच्या सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. कोणाला सुतक, कोणाचे जवळचे गेल्याने वर्षभर सण करणार नाही, तर शेजाऱ्याच्या दुःखामुळे अनेक जण सण साजरा करणार नाहीत, अशी अवस्था आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतेक सोशल मीडिया ग्रुपवर श्रद्धांजलीचे हात जोडले जात आहेत. हे ग्रुप जणू श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीच झाले की काय, अशी अवस्था आहे. सुविधा न मिळाल्याने कुटुंबातील व्यक्ती जेव्हा जाते, तेव्हा त्या कुटुंबीयांची जळफळाट रुग्णालय, प्रशासन, शासनकर्त्यांवर होणे साहजिकच आहे. 

बेडची उपलब्धता अन्‌ बिलाबाबत चुप्पी 

रोज हजारोंनी रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयांत बेड मिळणे दुरापास्त आहे. दोन-तीन लाख रुपये खिशात घेऊन रुग्णालये धुंडाळण्याची वेळ सध्या येत आहे. बेड मिळाल्यास आधी रुग्णालयात औषधे व ऍडमिटसाठी सुमारे एक ते दीड लाख रुपये भरावे लागत आहेत. त्यानंतरचे येणारे बिल वेगळेच. शासनाचे कोविडच्या बिलाविषयीचे नियम खासगी रुग्णालयांनी केव्हाच पायदळी तुडविले, हे प्रशासनालाही समजत आहे. आपल्या कुटुंबीयांना जगविण्यापुढे बिलाबाबत चुप्पी ठेवल्याशिवाय पर्याय नाही, अशी अनेकांची अवस्था झाली आहे. 

सुरक्षा हीच प्रत्येकाची जबाबदारी 

कोरोनाच्या काळात रुग्णालयांना, प्रशासनाला किंवा कोणत्याही यंत्रणेला दोष देण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःच नियम पाळायला हवेत. अनेक जण अजूनही मास्क वापरत नाहीत. पुढील सर्व परिणामांना सामोरे जाण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात करायला हवी. स्वतःबरोबर इतरांचीही काळजी करायला हवी. कोरोनापासून दूर राहण्याचा प्रयत्नच स्वतःला या महामारीतून वाचवू शकेल, हे लक्षात घेतले पाहिजे! 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख