जगातील लोक साईबाबांना साकडे घालतात अन इथले लोक अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्यांना

साई संस्थानवर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत निर्णय घेईल.
saibaba.jpg
saibaba.jpg

नगर : जिल्ह्याची ज्या दैवतामुळे जगात ओळख आहे, त्या शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांना जगातील लोक आपल्या सुखासाठी साकडे घालतात. सातासमुद्र पार करून दर्शनाला येतात. याच देवस्थानाच्या अध्यक्षपदासाठी वर्णी लागण्यासाठी संबंधितांना साईबाबा नव्हे, आपले वरिष्ठ नेते दिसतात. लोक दुःख दूर होण्यासाठी बाबांना साकडे घालतात, अन अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यासाठी संबंधित लोक आपल्या वरिष्ठ नेत्यांना, असे विरोधाभाषी चित्र बहुतेक सर्वच देवस्थानांच्या विश्वस्त निवडीच्या वेळी होते, यात नवल नाही. मात्र शिर्डीकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. (The people of the world cradle Sai Baba and the people here cherish the senior leaders for the presidency)

साई संस्थानवर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत निर्णय घेईल. भाजपकडे हे पद जाण्याची शक्यता नाही. शिवसेनेचा यावर दावा नाही, मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस या दोन्ही पक्षांनी यासाठी फिल्डिंग लावली आहे. आपलीच वर्णी लागावी, यासाठी काही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांकडे साकडे घालणे सुरू केले आहे. स्थानिक नेतृत्त्वांनी मात्र अध्यक्ष स्थानिकच असावा, त्याला परिसराची माहिती असावी, प्रश्नांची जाण असावी, शिर्डीचा विकास करण्याचे `व्हिजन` त्यांच्यात असावे, असे मुद्दे उपस्थित करून ही पोळी आपल्याच ताटात ओढण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

संस्थांची पदे कशासाठी

प्रत्यक्षात कोणत्याही संस्थांचे विश्वस्त पदे किंवा अध्यक्षपद हे संबंधित संस्थेच्या विकासासाठीच असते. त्यातून समाजाची सेवा घडावी, हाच उद्देश असतो. मात्र सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संस्था, सहकारी बॅंका, पतसंस्था अशा संस्थांकडे राजकीय अड्डा किंवा सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच त्यात मोठे राजकारण होऊन मतदान होते. ही संस्था आपल्या हातात असावी, यासाठी नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. त्यामुळेच संस्थांच्या माध्यमातून (की पैशातून) लोक आमदार, खासदार होतात, हे नगर जिल्ह्यालाच नव्हे, तर महाराष्ट्राला नवीन नाही. हे झाले इतर संस्थांचे. परंतु देवस्थानाच्या बाबतीत असे होऊ नये, ही माफक अपेक्षा असते. परंतु असे घडते, हे दुर्देव्यच. इतर संस्थांत `खाऊ`ची सवय लागलेले नेते जेव्हा अशा देवस्थानासारख्या संस्थावर प्रमुख म्हणून हक्क गाजवतात, तेव्हा गैरव्यवहारासारखे प्रकार घडतात. अशा कारणामुळेच बहुतेक मोठ्या देवस्थानांचे न्यायालयात खटले सुरू असतात.

कोणाची वर्णी लागणार

शिर्डीच्या साईसंस्थानवर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत सध्या जोरात राजकारण सुरू आहे. या पदावर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या माध्यमातून जोरदार हालचाली सुरू आहेत. आमदार आशुतोष काळे यांचे नाव घेतले जात आहे. तसेच पुण्यातीलही काही लोकांची नावे चर्चेत आहेत. काॅंग्रेसच्या माध्यमातून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे, युवा नेते तथा सत्यजीत तांबे यांचे नाव चर्चेत आहे. भाजप राज्यात विरोधी बाकावर असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता नाही. शिवसेनेकडेही राज्यातील इतर मोठ्या देवस्थानचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे तेही येथे डोके लावणार नाहीत. एकूणच देवस्थानच्या अध्यक्षपदावर सर्वसामान्यांना संधी मिळणार नाही, हे निश्चित आहे.

साईबाबा, हे काय? ! तुला नव्हे, वरिष्ठ नेत्यांना साकडे

लोकांची साईबाबांवर भक्ती आहे. त्यामुळेच ते आपल्या सुखासाठी, कुटुंबासाठी साईबाबांना साकडे घालतात. त्यांचे दुःख, बाबा तू लिलया दूर करतो. अनेक दैवी चमत्कार घडवून तू अन्यायाविरुद्ध उभा राहून न्याय दिला आहे. मग तुझ्याच संस्थेच्या अध्यक्षपदासाठी कार्यकर्ते तुला नव्हे, वरिष्ठ नेत्यांना का साकडे घालतात, हे कोडेच उलगडत नाही.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com