मुश्रीफसाहेब, अजून किती अंत पाहणार, मृत्युच्या तांडवाची इतिहासात नोंद होणार - How much more will Mushrif Saheb see, the ordeal of death will go down in history | Politics Marathi News - Sarkarnama

मुश्रीफसाहेब, अजून किती अंत पाहणार, मृत्युच्या तांडवाची इतिहासात नोंद होणार

मुरलीधर कराळे
शनिवार, 17 एप्रिल 2021

चिमणी-पाखरं उघडी झाली, डोक्यावरचं छतंच कोरोनाच्या वादळात उडालं. आगामी येणारे उन, वारे, पाऊस ही चिमुरडी कशी झेलणार. मोठे झाल्यानंतर हीच मंडळी तत्कालीन पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब तुमच्याच नावाने खडे फोडणार.

नगर : कोणाला कोरोना बेड मिळेना, कुणी व्हेंटिलेटरअभावी अखेरची उचकी देतात, तर अनेकजण आॅक्सिजनअभावी तडफडताहेत. अमरधाममध्ये शवाचे ढीग, अंत्यसंस्कारालाही जागा अपुरी पडल्याने नवीन तीन ठिकाणे शोधण्याची नामुष्की, सर्वसामान्य कर्जबाजारी, तर खासगी रुग्णालयांच्या बॅंक अकाउंटचा वाढता आलेख... अजून किती जणांची लाखोली सहन करणार, मुश्रीफ साहेब अजून किती अंत पाहणार

 

नगर जिल्ह्यातील प्रत्येक गल्लीत रोज काही ना काही वाईट घडतेय. कुटुंब प्रमुख, ज्येष्ठ व्यक्ती गेलेल्याने झालेला आक्रोश, तर अनेक भगिणीचे कुंकू पुसले गेल्याने झालेल आक्रदंत. चिमणी-पाखरं उघडी झाली, डोक्यावरचं छतंच कोरोनाच्या वादळात उडालं. आगामी येणारे उन, वारे, पाऊस ही चिमुरडी कशी झेलणार. मोठे झाल्यानंतर हीच मंडळी तत्कालीन पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब तुमच्याच नावाने खडे फोडणार.

अंगावरची हळद निखळली नव्हे, तोच कुंकवाने विश्वासघात केला, सुंदर कुटुंबाचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या गाडीचे एक चाकच निखळले. सर्वांत जास्त मृत्यू, सर्वांत जास्त हाल, सर्वांत जास्त रुग्ण अशा अनेक रेकाॅर्ड ब्रेक करणारे आकडे इतिहास रचणार, त्या सर्वांच्या मागे मुश्रीफ साहेब तुमचे नाव पालकमंत्री म्हणून लागणार. नगरच्या इतिहासात ही पाने सुवर्णाक्षरांनी नव्हे, तर कोळश्याने लिहिली जाणार.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर वचक हवा होता. खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर नजर हवी होती. जनसामान्यांना जगण्यासाठी धीर असता, आत्मविश्वास तुटला नसता, मुश्रीफ साहेब, तुम्ही स्वतः लक्ष घालून यंत्रणा हलवू शकत होता, पण... आता वेळ निघून चाललीय. जवळची माणसं निघून चाललीय. आहे त्या परिस्थिती बिघडू देऊ नका, नाहीतर मुश्रीफ साहेब तुम्हाला पुन्हा जिल्ह्यात येण्याचं निमंत्रण कोणीच देणार नाही.

कोविड सेंटरला भेट देणार पण...

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्ह्यात आहेत. शिर्डी येथील कोविड केअर सेंटर व 250 बेडच्या कोविड हेल्थ सेंटरला भेट, राहाता तालुक्‍यातील कोरोनाच्या सद्यःस्थितीची आढावा बैठक, कोपरगाव येथील कोविड केअर सेंटर, एसएसजीएम महाविद्यालयाला भेट, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या 300 बेड कोविड सेंटरची पाहणी, कोपरगाव तालुक्‍यातील कोरोना सद्यःस्थितीची आढावा बैठक, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यःस्थिती, लसीकरण व त्यावरील उपाययोजनांबाबत आढावा बैठक. असे अनेक मुश्रीफ यांचे आजचे कार्यक्रम. विविध कोविड सेंटरला भेट देऊन तेथील कोरोना रुग्णांशी संवाद साधतील, परंतु सेंटरमध्ये जागाच न मिळालेल्या रुग्णांचे काय झाले, याबाबत मुश्रीफ साहेब चर्चा करणार का?

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख