"ती' अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून करणे योग्य आहे का ?

कोरोनो संकटाशी लढताना काही लढवय्ये पोलिस, डॉक्‍टर्स, नर्सही बळी पडले. इतकेच नव्हे तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाने सोडले नाही. ते ही "आयसीयू'त जावून आले. या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा नितीन गडकरी. कोणत्याही नेत्यांने रस्त्यावर उतरून जीव धोक्‍यात घालून काम केले नाही. मग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तशी अपेक्षा करणे योग्य आहे का ?
"ती' अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून करणे योग्य आहे का ?

जसे देशावर कोरोनाचे संकट आहे तसे महाराष्ट्रावरही. आपला महाराष्ट्र संकटाविरोधात लढतोय. देशभरातील प्रत्येकाला संकटातही ओसरी देतोय. शेकडो परप्रांतियांची परिस्थिती पाहून मराठी घरमालकांनी त्यांच्याकडून भाडेही घेतले नाही. गावाला सुखरूप जा. काळजी घ्या. जाताना हातावर दोन पैसेही टेकविले ही आपली मराठी संस्कृती आहे. 

मुंबई, पुणेच नव्हे तर प्रत्येक गाव खेड्यात "अतिथी देवो भव:' पिढ्यानपिढ्या जपला जात आहे. मग, कोरोनाच्या संकटात तरी मराठी माणसाचे मदतीचे हात कसे आखूड होतील. कोरोनाचे संकट मोठे आहे. ते लवकर संपणारे नाही.

त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना करून पूर्व वैभव महाराष्ट्राला प्राप्त करून देण्याची गरज असताना का राजकारण केले जात आहे. ही वेळ भांडणाची नाही तर प्रत्येकाने हातात हात घालून गोरगरीबांसाठी लढण्याची आहे. हे सर्वांनीच विशेषत: भाजपच्या मंडळींनीही लक्षात घ्यायला हवे. 

लॉकडाऊनचे तीन टप्पे सरल्यानंतर चौथ्या टप्प्याला सुरवात झाली. या टप्प्यात काहीशी शिथिलचा देण्यात आली. व्यवहार हळूहळू सुरू होत आहे. तर दुसरीकडे स्थलांतरित मजुरांना आपल्या गावाची ओढ लागलीय. संकटात प्रत्येकाला "गड्या, आपला गाव बरा' वाटतो.

तशी या मजुरांची, कष्टकऱ्यांची भावना झाली असेल ती चुकीची आहे. असे म्हणता येणार नाही. आजमितीस मुंबई, पुण्यासह खेड्यापाड्यात परप्रांतिय मजुर पसरला आहे. हा आकडा एकदोन लाखाचा नाही तर पन्नास लाख मजूर महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. 

संकटात प्रत्येकाला आपल्या गावाला जावे असे वाटणे स्वाभाविक असले तरी त्यांना उठून लगेच धाडणे कोणत्याही यंत्रणेला शक्‍य नाही. जरी मुख्यंत्री उद्वव ठाकरेंच्या जागी देवेंद्र फडणवीस असते तरी. मुळात वास्तव समजून घ्यायला हवे. टीकाटिप्पणी करणे सोपे असते पण, मॉब सायकॉलॉजी सांभाळणे अवघड असते. 

देशातील इतर कोणत्याही राज्याबरोबर महाराष्ट्राची तुलना करणे मुळात चुकीचे आहे. आपला महाराष्ट्र नेहमीच रोजीरोटी देत आलाय. बिहार, यूपी सारख्याच मागास राज्यातीलच नव्हे तर ओडीशा, तेलंगण राज्यातील मजुरही मोठ्या संख्येने येथे वर्षानुवर्षे आहेत.

आज राज्याची लोकसंख्या 11 कोटी 30 लाखांच्या घरात गेली आहे. त्यात मुंबईची 1 कोटी 30 लाख आणि त्या खालोखाल पुेण्‌, पिंपरी-चिंचवड धरून 60-65 लाख लोखसंख्या आहे. या लोकसंख्येचा विचार केल्यास यामध्ये स्थलांतरित मजुर किती, हे मजुर राहतात कुठे ? याचा विचारही व्हायला हवा. 

अवाढव्य पसरलेल्या झोपडपट्टीत कोरोना घुसलाय. त्यामुळे हे संकट लगेच संपणे शक्‍य नाही. या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते मदतीसाठी पुढे आहेत. हे कोणीही नाकारणार नाही.

भाजपने थोडे इकडंचतिकडचं राजकारण केले. आता चौथ्या टप्प्यात ते पुन्हा आक्रमक झालेले दिसतात. त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. आरोग्याचा बोजवाजा उडाल्याचा त्यांचा दावा काहीप्रमाणात खराही असू शकतो. 

इतकी मोठी लोखसंख्या म्हटल्यानंतर उणेअधिक होणारच. म्हणून हे "सरकार हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेले नाही'. एकीकडे आघाडी सरकारवर टीका सुरू झाली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोशल मीडियावरून आवाहन करतात.

कार्यालयात बसून असतात. त्यांनी बाहेर पडावे अशी टीकाही त्यांच्यावर केली जात आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे काय किंवा राणे कंपनी काय ! असे आरोप करण्यात पुढे असतात. 

आपल्या मंत्रालयातील प्रधान सचिवांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना झाला. माझा आगाऊपणा नडला हे तर त्यांनी स्पष्टच केले आहे. दुसरे मंत्री बच्चू कडू यांनीही अनुभव घेतला. राज्यात आतापर्यंत तेराशेजणांना मृत्यू झाला आहे आणि चाळीस हजाराहून अधिक रुग्ण आहेत. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ही समाधानाची बाब आहे. 

मुळात सोशल डिस्टनिंग हाच या आजारावर उपाय आहे. प्रत्येक नेता शेकहॅन्ड करायलाही धजावत आहे. या रोगाचा संसर्ग कशामुळे होतो हे लपून राहिलेले नसताना उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरण्याची अपेक्षा करणे हास्यास्पद आहे.

मुख्यमंत्री रणांगणात उतरले तर आरोग्य व्यवस्थेला काम करणेही अवघड होऊन बसले असते. मुख्यमंत्री ठाकरे,आरोग्यमंत्री टोपे काय किंवा अनिल देशमुख काय हे काम करीत आहेत. पण, त्यांना जीव नाही का ? याचा विचार कोण करणार ? 

मुख्यमंत्री ठाकरे हे आरोग्याची काळजी का घेत आहेत हे सर्वश्रुत आहे. तरीही त्यांनी कोरोना रुग्णांची गळाभेट घेण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे अशी जर कोणी अपेक्षा करीत असतील तर यांना काय म्हणावे. अशी अपेक्षा कणाऱ्या नेत्यांनी मिनीटभर आरशासमोर उभे राहावे आणि आपण किती कोरोना रुग्णांची सेवा केली हा प्रश्‍न स्वत:ला विचारावा. 

राजांने प्रत्येकवेळी रणांगणात लढायला उतरलेच पाहिजे असे काही नाही. तर प्रत्येक युद्धात,संकटात तो दक्ष असला पाहिजे. युद्ध जिंकणाऱ्यांची पाठ थोपटायची असते, कौतुक करायचे असते, सत्कार करायचा असतो आणि धारातीर्थ पडलेल्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करायचे असते. वेळ आल्यास राजाने मैदानात उतरले पाहिजे हे खरे पण, कारण नसताना जीव धोक्‍यात घालण्याचे कारण तरी काय ? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com