विकास दुबे एनकाऊंटर - उजेडात होते पुण्य...अंधारात पाप!

उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये पकडायला आलेल्या आठ पोलिसांची हत्या करून फरारी झालेला गँगस्टर विकास दुबे अखेर आज सकाळी पोलिसांच्या हातून मारला गेला. आता या 'एनकाऊंटर'बद्दल प्रश्न निर्माण होणार हे स्वाभाविक आहे. त्याचे पडसाद उमटायला सुरुवातही झाली आहे. विकास दुबेचे आठ पोलिसांना मारण्याचे कृत्य घृणास्पद निश्चितच होते.पण पोलिसांच्या गोळ्या खाऊन मरताना तो अनेकांना न पचणारी सत्ये बरोबर घेऊन गेला हे देखिल वास्तव आहे.
Whether Vikas Dubey Encounter Right or Wrong
Whether Vikas Dubey Encounter Right or Wrong

Extra Judicial Killings अर्थात एनकाऊंटर किंवा चकमक हा पोलिसांचा आवडता खेळ. गुन्हेगाराला समाजात बांडगुळाप्रमाणे फोफावून द्यायचे आणि मग त्याचा भस्मासूर व्हायला लागला की त्याला गोळ्या घालून संपवायचे हे आजवर अनेक प्रकरणात चालत आले आहे. कुप्रसिद्ध डाॅन दावूद इब्राहिमला मोठे करण्यात, त्याला मुंबईतल्या पठाण टोळ्यांच्या विरोधात उभा करणारा राजबीर लिखा हा एक पोलिस अधिकारीच होता, ही वस्तुस्थिती आहे. 

ही एनकाऊंटर कधी सुरु झाली याबद्दल अनेक प्रवाद आहेत. कुणी राजस्थानात अजय राज शर्मांनी डाकूंच्या टोळीचे केलेले एनकाऊंटर पहिले मानतात. तर कुणी मुंबईत झालेले मन्या सुर्वेचे एनकाऊंटर. वादाचा विषय तो नाही. मुळात एनकाऊंटर हा विषयच वादग्रस्त आहे. दहा बारा वर्षांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये दिवसाआड मुंबईतल्या एनकाऊंटरच्या बातम्य प्रसिद्ध व्हायच्या......

...अमूक गुन्हेगार तमूक ठिकाणी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा रचला. गुन्हेगार तिथे येताच पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्याने पोलिसांवर गोळीबार केला. एक गोळी अमूक एका आॅफिसरला चाटून गेली. मग पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात हा गुन्हेगार जखमी झाला. त्याला XXX रुग्णालयात नेले असता तेथे तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले.....

अशा छापाच्या त्या बातम्या असत. ही एनकाऊंटर बहुसंख्य वेळा पहाटे किंवा मध्यरात्रीच होत. (विकास दुबेचे आजचे एनकाऊंटरही पहाटेच झाले). उघड दार देवा आता...हे स्व. जगदीश खेबुडकरांचे अजरामर गीत. त्या गीतात एक वाक्य आहे. कवी म्हणतात....उजेडात होते पुण्य अंधारात पाप...ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप! आता उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबेला मारून कुठल्या कर्तव्याचे माप स्वतःच्या पारड्यात टाकले, यावर शंका घ्यायला वाव आहे आणि ती घेतली जायलाही लागली आहे. सहकाऱ्यांच्या मृत्यूचा बदला पोलिसांनी घेतला म्हटले तर ते मानवी भावनांना धरून योग्य आहे. पण..An eye for an eye will leave the whole world blind 

असे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हणून ठेवले आहे. आणि हे असे सत्य आहे जे दुर्लक्षून चालणार नाही. 

वर्दीचीच होती साथ

विकास दुबे हा कुणी साधूसंत नव्हता. ज्याच्यावर साठहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, असा निर्ढावलेला गुन्हेगार होता. पण केवळ एकट्याच्या बळावर त्याने ही कृत्ये केली हे मानण्याएवढे लोक भोळे नाहीत. अगदी दोन जुलैची घटना पाहिली तरी पोलिस तुला पकडायला येत आहेत, हे त्याला सावध करणारी वर्दीतलीच माणसे होती, हे लपून राहिलेले नाही. पोलिस ठाण्यात घुसून भाजपच्या मंत्र्यांची हत्या करणारा हा एक नराधम होता. तीस वर्षांपासून कानपूर व परिसरात त्याची दहशत होती. 

कानपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे व विकास दुबेचे संबंध असल्याचे पत्र मारल्या गेलेल्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वी पाठवले होते. त्या पत्राची दखलच घेतली गेली नाही. उत्तर प्रदेशातल्या कुख्यात गुन्हेगारांच्या यादीत त्याचे नाव नसणे हा देखिल गंभीर राजकीय विनोद आहे. थोडक्यात विकास दुबेला 'खाकी'चा आश्रय होता, तसाच तो 'खादी'चाही होता, हे उघड आहे. नेमकी हीच गुपीते पोटात ठेऊन विकास दुबे मेला आहे. त्याचे जवळचे बहुतांश साथीदार २ जुलैनंतर मारले गेले आहेत. त्यामुळे त्याचे आश्रयदाते कोण, सत्य उजेडात येण्याची शक्यता नाही. 

माध्यमांच्या गाड्या थांबवल्या

विरोधक म्हणून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी हे प्रश्न उपस्थित करणारच. तो त्यांचा लोकशाहीतला हक्क आहे. पण प्रशांत भूषण यांच्यासारख्या कायदेतज्ज्ञानेही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले  आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. विकास दुबेला पोलिस उज्जैनहून कानपूरला घेऊन येत होते. त्यावेळी माध्यमांच्या गाड्या पाठलाग करत होत्या. या गाड्यांना एनकाऊंटर होण्यापूर्वी अर्धा तास एका ठिकाणी सक्तीने थांबवण्यात आले होते. हे कशाचे चिन्ह आहे, असा प्रश्न कुणी विचारला तर तो वावगा ठरू नये. 

फाशी हा मार्ग ठरला असता योग्य

राजकारण्यांची गरज म्हणून विकास दुबेसारखे पोसले जातात, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गुन्हेगारीचे राजकारण होवू लागलंय, यावर राष्ट्रीय भूमिका व्हायला हवी असेही ते म्हणतात. दुसऱ्या बाजूला 'देशातील कुठलंही राज्य असतं तरी पोलिसांनी बदला घेतला असता', असे सांगत ते या एनकाऊंटरचे समर्थनही करतात. विकास दुबेला जगण्याचा हक्क नव्हताच. पण त्यासाठी 'फाशीचा दोर' हाच योग्य मार्ग ठरला असता. कारण बंदुकीची गोळी क्षणात प्राण घेते. तिथे आपली पूर्वाश्रमीची कृत्ये आठवायला वावच नसतो. फाशीचे तसे होत नाही. त्या दिवसाची वाट पहात गुन्हेगार रोजच्या रोज मरत असतो. आज उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबेला त्याची कृष्णकृत्ये आठवून रडण्याची संधीच दिली नाही. 

उत्तर प्रदेश, बिहार यासारखी राज्ये ही गुन्हेगारांसाठी नंदनवन आहेत, असे बोलले जाते. ही टीका अगदीच अनाठायी नाही. याला कारण राजकारणी आहेत, हे तितकेच सत्य आहे. अनेक गुन्हेगार देशाच्या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदीरात म्हणजे संसदेत खासदार म्हणून पोहोचल्याचेही या देशातल्या जनतेने पाहिले आहे. आपले आठ सहकारी हुतात्मा झाले यासाठी पोलिसांचा संताप होणे स्वाभाविक आहे. पण रोज असे किती विकास दुबे तयार होत आहेत, याचाही कधीतरी विचार व्हायला हवा. हे आत्मपरिक्षण राजकारण्यांनीही केले पाहिजे. इथे मात्र  हा विवेक सुटलेला दिसतो!

Edited By - Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com