शिरूरमध्ये आजची रात्र `महत्त्वाची` ठरणार!

शिरूरमध्ये आजची रात्र `महत्त्वाची` ठरणार!

शिरूर : मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आल्यानंतरच्या, शिरूर लोकसभा मतदार संघातील तिसरी निवडणूक उद्या होत असून, प्रशासकीय यंत्रणेसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. काल सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर गुप्त बैठका, चर्चा, आडाखे यांना जोर आला असून, सर्वतोपरी प्रयत्नांनंतर मतदानापूर्वीची आजची "शेवटची रात्र' निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे.

या मतदारसंघाचे सलग दोन वेळा; तर खासदार म्हणून सलग तिसऱ्यांदा सर्वशक्तीनिशी रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांच्यासमोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसने डॉ. अमोल कोल्हे या प्रभावी अभिनेत्याला रिंगणात उतरविल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी सुसज्ज यंत्रणा मैदानात उतरवल्याने प्रचारातही कमालीची रंगत आली होती. आढळराव व कोल्हे यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात असले; तरी या सरळ लढतीवर साधक - बाधक परिणाम करू शकतील, असे तिसरे नाव या यादीत दिसत नसल्याने दुरंगी सामनाच रंगणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. 


या मतदारसंघात एकूण 21 लाख 73 हजार 527 मतदार असून, गतवेळच्या तुलनेत सुमारे दोन लाख मतदारांची नव्याने वाढ झाली आहे. या मतदार संघात शिरूर, आंबेगाव, जुन्नर, भोसरी, खेड व हडपसर या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असून, मतदानासाठी एकूण दोन हजार 296 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अंध, अपंग व विकलांग व्यक्तींच्या मतदानासाठी मतदान कर्मचारी सर्वतोपरी मदत करणार आहेत. मतदार संघात एकूण 23 उमेदवार असल्याने व एका बॅलेट युनिटवर 15 उमेदवारांचीच नावे बसू शकत असल्याने प्रत्येक ठिकाणी दोन बॅलेट युनिट असणार आहेत. शिरूर मतदारसंघासाठी दोन हजार 755 बॅलेट युनिट, तेवढेच कंट्रोल युनिट आणि तीन हजार 77 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून दिल्या असून, नव्याने प्राप्त झालेल्या अडीच हजार मशिनही तयार ठेवण्यात आल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.

 पुणे व बारामती मतदार संघात तुलनेने कमी मतदान झाल्याने येथे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. "शिरूर प्रबोधन मंच' च्या कार्यकर्त्यांनी भर उन्हात "देशहिताचे भान, शंभर टक्के मतदान'; तर "यशस्विनी सामाजिक अभियान' च्या महिला पदाधिकाऱ्यांनी "मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो' च्या गजरात शेतशिवारातील मजूर ते न्यायालयातील वकीलांपर्यंत मतदान जागृती केली. पर्यावरण दक्षता कृती मंच व विविध सामाजिक संघटनांनीही मतदार जागृती अभियान राबविले. 

कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेच्या शिक्षिका बेबीनंदा सकट यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेत मतदार जागृती अभियानांतर्गत शाळेच्या आवारात भव्य व आकर्षक रांगोळी रेखाटली. रविवार हा सुटीचा दिवस असून, विद्यार्थी ही रांगोळी रेखाटण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. उद्या मतदान होईपर्यंत ही रांगोळी शाळेच्या आवारात मतदारांना पाहता येईल. 

मतदानाच्य आदल्या दिवशी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिरूर पोलिस दलाने शहरातून शानदार संचलन केले. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या नेतृत्वाखालील या संचलनात सर्व पोलिस, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी, गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते. पोलिस दलाच्या बॅंडपथकाच्या तालावर झालेले हे शानदार संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com