Today's birthday : Vishal Patil | Sarkarnama

विशाल पाटील यांनी तेवत ठेवली सहकाराची ज्योत

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

वसंतदादा पाटील या नावाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वलय आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या महाराष्ट्रात दादांचे कार्यकर्ते विखुरले आहेत. समाजकारणाच्या सर्व क्षेत्रात ते विखुरले आहेत. त्या कुटुंबातील असणं ही एक ताकद आहे. मात्र त्यासोबत अनेक मर्यादाही येतात. त्यावर मात करून राजकारणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असलेले दादांच्या तिसऱ्या पिढीतील युवा नेतृत्व विशाल पाटील यांच्यासाठी येणारा काळ आव्हाने आणि कसोटीचा असेल. 

वसंतदादा पाटील या नावाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वलय आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या महाराष्ट्रात दादांचे कार्यकर्ते विखुरले आहेत. समाजकारणाच्या सर्व क्षेत्रात ते विखुरले आहेत. त्या कुटुंबातील असणं ही एक ताकद आहे. मात्र त्यासोबत अनेक मर्यादाही येतात. त्यावर मात करून राजकारणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असलेले दादांच्या तिसऱ्या पिढीतील युवा नेतृत्व विशाल पाटील यांच्यासाठी येणारा काळ आव्हाने आणि कसोटीचा असेल. 

विशाल पाटील यांची महाराष्ट्राला ओळख झाली, ती गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी. ते वसंतदादांचे नातू. कॉंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीच्या चर्चेत सांगलीची हक्काची जागा संघटनेच्या वाट्याला गेली. स्वातंत्र्यानंतर एकदाच कॉंग्रेसच्या ताब्यातून ही जागा गेली. तिथे पुन्हा कॉंग्रेसच लढतीच्या चित्रातच नाही म्हटल्यावर इथल्या कॉंग्रेसजणांमध्ये एकच हल्लकल्लोळ उठला. वसंतदादांच्या समाधीच्या साक्षीने आणाभाका झाल्या आणि या लढतीत ऐनवेळी वसंतदादांचे नातू विशाल पाटील उतरले. 

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याविरोधात त्यांनी निकराची लढत दिली. तब्बल...साडेतीन लाख मते त्यांनी मिळवली. ऐनवेळी मैदानात उतरूनही आणि कॉंग्रेसचे चिन्ह सोबत नसूनही त्यांनी घेतलेली मते ही वसंतदादा नावाची जशी जादू आहे तशीच विशाल पाटील यांचीही आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर विशाल यांची ही दमदार एंट्री आहे. येणारा काळ त्यांचा आहे याची जाणिव करून देणारी आहे. 

दादा नावाचे वलय जसे विशाल यांना लाभले आहे, तसेच या नावाने आलेल्या मर्यादाही आहे. वसंतदादांच्या अनेक संस्था लयाला गेल्यानंतर विशाल राजकारणात आले. त्यांच्या कोवळ्या हातात आर्थिक गर्तेत लोटलेला वसंतदादा कारखाना आला. अध्यक्ष म्हणून त्यांनी या कारखान्याची धुरा हाती घेतली, तेव्हा हा बसलेला हत्ती उठवायचा कसा, हा सर्वात मोठा प्रश्‍न होता. विशाल पाटील यांनी अतिशय कसबीने सहा वर्षे धुरा सांभाळली. 

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा बाजार होत असताना विशाल यांनी जिल्हा बॅंकेच्या मदतीने कारखान्यावरील कर्जाचे पुनर्गठन करून भाडेतत्वावर देण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. सुमारे दहा वर्षांसाठी दत्त इंडिया कंपनीला कारखाना भाडे तत्वावर दिला. त्यामुळे हा कारखाना आज सहकारात राहिला. आज ना उद्या कर्जमुक्त होऊन हा कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा होईल.

एकीकडे सहकारातील कारखाने तोट्यात आणायचे आणि ते स्वतःच खरेदी करायचे असा फंडा सुरु असताना सहकाराचे महामेरू असलेल्या वसंतदादांच्या नावे असलेला कारखाना सहकारात ठेवण्याचे कार्य विशाल यांनी केले. 

वसंतदादा दूध संघाची सहकारातील ज्योत त्यांनी अजूनही तेवत ठेवली आहे. या सर्व संस्थांना ते पुनरुज्जीवित करू शकले, तर त्यांचे राजकारणही पुनरुज्जीवित होऊ शकेल. चांगले वक्तृत्व, कार्यकर्त्यांची नेमकी नस आणि जिल्हाभरातील जुन्या दादाप्रेमी कार्यकर्त्यांसोबत नव्याने जोडून घेण्याची त्यांची जिद्द ही त्यांचे बलस्थाने आहेत. 

सांगली महापालिका क्षेत्र आणि मिरज तालुक्‍याच्या राजकारणात त्यांनी आता जातीने लक्ष घातले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा या मतदारसंघात ते कोणते निर्णय घेऊन वाटचाल करतात यावर पुढची त्यांचे राजकीय यश असेल. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख