Todays Birthday Sushilkumar Shinde Senior Leader Congress  | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुशीलकुमार शिंदे (ज्येष्ठ नेते, काँग्रेस) 

महेश जगताप 
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्एल्.बीचे शिक्षण पूर्ण केले. 

पुणे : कोणतीही राजकारणाची पार्श्वभूमी नसताना, घरात अठरा विश्व दारिद्र्य, अशा संघर्षमय परिस्थितीमध्ये लढा देऊन आमदार, मुख्यमंत्री ते केंद्रीय गृहमंत्री असा प्रवास..काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी ओळख असलेले काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा आज वाढदिवस. 

शिंदे यांचा जन्म माकडाची उपळाई (परांडा तालुका, उस्मानाबाद जिल्हा) या खेड्यात सामान्य गरीब कुटुंबात झाला. सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात दोन पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना शाळेत बसविलेल्या नाटकातही ते काम करायचे. 

न्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्‍लार्कची जागा मिळाली. १९६५ मध्ये बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्या वेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्या वेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहीरात आली. त्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यातूनच मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्एल्.बीचे शिक्षण पूर्ण केले. 

पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबईत भोईवाडा न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला. वकिली करत असतानाच काँग्रेस पक्षाच्या राजकारणात सक्रिय सहभागी झाले (१९७१). सुरुवातीस त्यांनी ‘काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट अॅक्शन’ या समितीचे प्रदेश निमंत्रक म्हणून काम पाहिले. दरम्यान त्यांनी जानेवारी १९७३ मध्ये शरद पवार यांचे  शिंदे यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे करमाळा (सोलापूर जिल्हा) या राखीव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे पोटनिवडणूक लढविली आणि ते मताधिक्याने विजयी झाले. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू झाली. 

वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात ते राज्यमंत्री होते. पुढे शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. याच काळात ‘इंडियन जेसिज’ या संस्थेने निवडलेल्या देशातील दहा कर्तबगार तरुणांत त्यांचा अंतर्भाव होता. पुढे शरद पवारांच्या पुलोद मंत्रीमंडळात (१९७८) ते होते.  त्यानंतर त्यांनी १९८३–९२ या काळात राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले. तब्बल नऊ वेळा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी विधानसभेत सादर केला .त्यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीवर तसेच सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यावर (१९९२) त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याच वर्षी त्यांची राज्यसभेवर निवड झाली.
  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून १९९०-९१ आणि १९९६-९७ अशी दोनदा त्यांची निवड झाली. बाराव्या लोकसभेवर प्रथमच सोलापूरच्या सर्वसाधारण मतदारसंघातून एक लाखापेक्षा अधिक मतांनी ते निवडून आले. पुढील वर्षी लगेचच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले. १८ जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली. पुढे त्यांची केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली (२९ जानेवारी २००६). त्याचबरोबर पुढे लोकसभेचे नेते व केंद्रीय ग्रहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून शिंदे यांची भारतीय राजकारणात ओळख आहे .

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख