today's birthday nitin gadkari | Sarkarnama

आजचा वाढदिवस : नितीन गडकरी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 27 मे 2020

शालेय जीवनापासून ते जनसंघाच्या काळापर्यंतच्या आठवणींना त्यांच्या बालपणीच्या मित्रांनी उजाळा दिला. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आक्रमक राहिलेले नितीन गडकरी मोठे नेते होतील, असे लहानपणीच वाटले होते.

पक्ष, जात, पात, धर्म, पंथ, भाषा या सर्वांच्या पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माणसातील माणूसपण कायम जपले आहे. सर्वांशीच त्यांचे मित्रत्वाचे नाते असून आपल्या साध्या, सरळ आणि मनमिळाऊ स्वभावाने सर्वांना जोडून ठेवले आहे. राज्यात असो वा केंद्रात झपाटल्यागत काम करणे, येवढेच त्यांना माहीती आहे. रोखठोक बोलून मोकळे होणे, हा त्यांचा स्वभाव आहे. या स्वभावामुळे मी बरेचदा अडचणीत येतो, पण काही केल्या माझी ही खोड काही जात नाही, असेही ते दिलखुलासपणे सांगतात. 

शालेय जीवनापासून ते जनसंघाच्या काळापर्यंतच्या आठवणींना त्यांच्या बालपणीच्या मित्रांनी उजाळा दिला. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आक्रमक राहिलेले नितीन गडकरी मोठे नेते होतील, असे लहानपणीच वाटले होते, असे गडकरींचे बालपणीचे मित्र प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्‍टर विलास डांगरे म्हणाले. वादविवाद स्पर्धांमध्ये ते राष्ट्रपुरुष, राष्ट्रधोरण यावर बोलायचे. आम्हाला तेव्हा ते स्वप्नरंजन वाटायचे. पण, चाळीस वर्षांनंतर आमचे ते स्वप्नरंजन त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्याचे डॉ. पुरण मेश्राम म्हणाले. केंद्रीय राजकारणात मोठ्या पदापर्यंत ते पोचले. पण त्यांना त्याचा कोणताही गर्व नाही. ते आजही तितकेच साधे, सरळ, मनमोकळे आहे. सर्वांशी मित्रत्वाच्या नात्याने वागतात, असे मजिद अब्दुल करीम पारेख म्हणाले. 

छात्र जागृतीच्यावतीने गडकरींच्या वाढदिवसानिमित्त विशेष लाइव्ह संवादाचे आयोजन करण्यात आले होते. "नितीन गडकरी एक व्यक्तिमत्त्व' या शिर्षकांतगईत झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्‍टर विलास डांगरे, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डीम युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम आणि सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनी नवी दिल्लीचे विभागीय सचिव मजिद अब्दुल करीम पारेख आदी सहभागी झाले होते. व्यासपीठावर आयोजक छात्र जागृतीचे सचिव ऍड. निशांत गांधी होते. आकाशवाणीच्या उद्‌घोषिका श्रद्धा भारद्वाज यांनी गडकरींच्या या सर्व मित्रांना बोलते केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख