खासदार गोडसे अयोध्या दौऱ्यापासून यंदाही दूर

............
 खासदार गोडसे अयोध्या दौऱ्यापासून यंदाही दूर

नाशिक : गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राम मंदिराच्या प्रश्‍नावर भाजपला कोंडीत पकडणाऱ्या शिवसेनेकडून सात मार्चलाही पुन्हा अयोध्येत महाआरती होणार असून आयोजनाची जबाबदारी गेल्या वेळप्रमाणेच नाशिक शिवसेनेवर सोपविली आहे. नाशिकमधील शिवसैनिकांसाठी ही बाब अभिमानास्पद असल्याचे मानले जात आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या अयोध्या दौऱ्याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांना टाळले होते. यावर्षीदेखील गोडसे यांना टाळून दौरा केल्याने संघटनेच्या कामातून त्यांना दूर केले जात असल्याचे दिसून येत आहे. गोडसे यापूर्वीही संघटनेच्या कार्यात कधी सहभागी न झाल्याने त्यांच्या विरोधात संघटनेत नाराजी आहे. त्यामुळे अयोध्येतील शिवसेनेच्या बिग इव्हेंटपासून त्यांना जाणूनबुजून दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. 

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 7 मार्चला उत्तर प्रदेशातील अयोध्येचा दौरा करणार आहेत. या दिवशी सकाळी श्री रामलल्लाचे दर्शन, संध्याकाळी शरयू नदीकाठी महागंगा आरती होणार आहे. राम मंदिराचा निकाली निघालेला प्रश्‍न व राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा महागंगा आरतीला उत्साह दिसून येणार आहे. गेल्या वर्षी गंगा आरतीसह अयोध्या दौऱ्याच्या आयोजनाची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडून नाशिकमधील शिवसैनिकांवर सोपविली होती. 

योग्य नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाल्याने यंदाही नाशिकवर आरती व व्यवस्थापनाची जबाबदारी खासदार राऊत यांनी सोपविली आहे. अयोध्या दौऱ्यानिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत यांच्यासोबत नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, बाळासाहेब सानप, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर दाखल झाले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com