Three shiv sena presidents in Maerathwada | Sarkarnama

मराठवाड्यात शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद अध्यक्ष 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 मार्च 2017

भाजपला लातूर, बीड, राष्ट्रवादीला उस्मानाबाद, परभणी मध्ये अध्यक्षपद मिळवता आले.कॉंग्रेला मात्र एकमेव नांदेड जिल्हा परिषदेत अध्यक्ष करता आला.

औरंगाबाद :भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी केलेली युती त्यांच्या पथ्यावर पडली असून दुसऱ्या क्रमाकांवर असतांना शिवसेनेला औरंगाबाद व जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवता आले. तर हिंगोलीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले.

त्याखालोखाल भाजपला लातूर, बीड, राष्ट्रवादीला उस्मानाबाद, परभणी मध्ये अध्यक्षपद मिळवता आले.

कॉंग्रेला मात्र एकमेव नांदेड जिल्हा परिषदेत अध्यक्ष करता आला.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना या दोन जिल्हा परिषदामध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडूण आलेले असतांना देखील शिवसेनेची साथ न मिळाल्याने भाजपला दोन अध्यक्षपदांवर पाणी सोडावे लागले आहे. 

मराठवाड्यातील आठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. बीडमध्ये अनपेक्षितपणे भाजपने मुंसडी मारत राष्ट्रवादीवर मात केली. माजीमंत्री सुरेश धस यांनी भाजपला मदत करण्याची उघड भूमिका घेतल्याने बीडमध्ये भाजपचा अध्यक्ष होऊ शकला. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक 26 सदस्य असतांना भाजपचा अध्यक्ष झाल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी नाचक्की झाली.

उस्मानाबाद, परभणीत राष्ट्रवादीला अध्यक्षपद राखण्यात यश मिळाले. उस्मानाबादेत भाजपने पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीला कॉंग्रेसकडून सत्ता खेचता आली. कॉंग्रेस, शिवसेनेने अध्यक्षपदासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा परिषदेतील सत्ता आबाधित राखत अध्यक्षपद मिळवले. संपुर्ण मराठवाड्यात कॉंग्रेसला यश देणारा जिल्हा म्हणून नांदेड ओळखला जाऊ लागला आहे. 

दानवे, लोणीकरांवर खोतकरांची मात 

जालना जिल्हा परिषदेची सत्ता व अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. पण शिवसेनेचे राज्यमंत्री अनिरूध्द खोतकर यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन या दोन नेत्यांना मात दिली. दानवे कन्या आशा पांडे हिला तर लोणीकर मुलगा राहूल याला अध्यक्ष करण्याच्या तयारीत होते. मात्र खोतकर यांनी बाजी मारत बंधू अनिरुध्द खोतकर यांना अध्यक्ष करत जिल्ह्यात शिवसेनेचे व स्वःताचे राजकीय वजन वाढवल्याचे दिसते. 

कुणाचा कुठे अध्यक्ष, उपाध्यक्ष 

औरंगाबाद- ऍड. देवयानी डोणगांवकर, अध्यक्ष (शिवसेना) 
केशवराव तायडे, उपाध्यक्ष ( कॉंग्रेस) 

जालना- अनिरुध्द खोतकर, अध्यक्ष (शिवसेना) 
सतीश टोपे, उपाध्यक्ष (राष्ट्रवादी) 

हिंगोली- शिवराणी नरवाड, अध्यक्ष (शिवसेना) 
अनिल पंतगे, उपाध्यक्ष ( कॉंग्रेस) 

बीड- सविता गोल्हार, अध्यक्ष (भाजप) 
जयश्री म्हस्के, उपाध्यक्ष (शिवसंग्राम-आघाडी) 

लातूर- मिलिंद लातूरे, अध्यक्ष (भाजप) 
रामचंद्र तिरके, उपाध्यक्ष (भाजप) 

नांदेड- शांताबाई जवळगावकर, अध्यक्ष (कॉंग्रेस) 
समाधान जाधव, उपाध्यक्ष ( राष्ट्रवादी) 

उस्मानाबाद- नेताजी पाटील, अध्यक्ष (राष्ट्रवादी) 
अर्चना पाटील, उपाध्यक्ष (राष्ट्रवादी)
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख