`होम क्वारंटाईन`चा शिक्का असलेले तिघे मटणाच्या रांगेत....थेट पोलिसांना बोलवले

कोल्हापुरात मटण घेण्यासाठी रविवारी गर्दी झाली. पण त्यात धक्का बसेल असेल वर्तन या तिघांनी केले.
corona kolhapur
corona kolhapur

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापुरात आज मटण, चिकन, मासे विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी दिली.

रविवार असल्याने काल (ता. 29 मार्च) नेहमीप्रमाणे मटण, चिकन, मासे घेण्यासाठी मटण मार्केटमध्ये, शहरातील अन्य चिकन सेंटरसमोर कोल्हापुरकरांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी तर वादही झाले. कोरोना विषाणूंचा फैलाव होऊ नये, म्हणून शासन, केंद्र शासनाने घरी थांबा हे सांगूनही अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. गर्दी होती, तेथे पोलिस गेल्यानंतर चिकन सेंटर बंद करण्यात आली.

अशातच होम क्‍वारंटाईनचा हातावर असलेला शिक्का असलेल्या तीन व्यक्ती आज मुख्य मटण मार्केटमध्ये चिकन घेण्यासाठी आल्या होत्या. त्या तीन व्यक्तींनी क्वारंटाईनचा शिक्का दिसू नये, म्हणून हॅन्डग्लोव्हज्‌ घातले होते. नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलविले. त्या व्यक्तींना बाजूला केले. घरी पाठविले. हॅन्डग्लोव्हज्‌ बाजूला केल्यानंतर हा शिक्का दिसला. अनेकजण मुख्य मटण मार्केटमध्ये मटण, चिकन, मासे घेण्यासाठी येत असतात. यामुळे परिसरातील नागरिकांनी मटण विक्री करु नये, असे सांगितले. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आज मटण विक्री बंद करण्यास सांगितले. त्यानुसार ही विक्री बंद केली.

अशा प्रवृत्तांनी काय करायचं?

ढगळ टी शर्ट, बर्म्युडा अशा एकदम निवांत पेहरावात ते गल्लीच्या कोपऱ्यावर येतात. रस्त्यावरची एवढी सगळी शांतता जणू काही आपल्याला गप्पा मारण्यासाठीच असे समजून कट्टयावर मांड्या घालून बसतात. कोरोनासंदर्भात खऱ्या कमी आणि नको त्या बातम्यांचीच चर्चा करतात. मध्येच ख्या ख्या करून आचकट पाचकट विनोद करत असतात.

अचानक पोलिस गाडी आल्याचा आवाज लांबूनही येतो. मग हे लगेच गल्ली बोळात पळत सुटतात. पोलिस उतरतात. दरडावतात आणि निघून जातात. मग हेही पुन्हा हळूहळू एक एक गल्लीच्या कोपऱ्यावर येतात. पोलिसांना कस चकवलं, याचा असुरी आनंद एकमेकाच्या हातावर टाळी देऊन व्यक्त करतात.

कोल्हापुरातल्या प्रत्येक भागातले हे चित्र आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी आहे, हे विसरून ही संचारबंदी म्हणजे आपल्याला जगाच्या गप्पा मारण्यासाठी मिळालेली संधी आहे, अशी बहुतेकांची समजूत आहे. आणि पोलिसांची निम्मी ताकद अशा निवांत टोळक्‍यांना पांगवण्यासांठी खर्ची होत आहे. संचारबंदी लोकांच्या आरोग्यासाठी आहे. पण, जणू काही त्याची गरज फक्त पोलिसांनाच आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती बहुतेक भागात तयार झाली आहे.

पोलिस नियंत्रण कक्षात बहुतेक येणारे फोन हे इथे टोळके थांबले आहे, इथे रस्त्यावर क्रिकेट सुरू आहे, इथे मोटारसायकलवरून तरूण फिरत आहेत, संचारबंदी कधी संपणार आहे, आम्हाला गावाला जायचे आहे या संदर्भातलेच आहेत. आणि जिल्हयात तीन हजार पोलिस तीन पाळ्यात चोवीस तास गेले आठ दिवस रस्त्यावर आहेत. अधूनमधून पोलिसांचा मिळणारा "प्रसाद'ही यासाठी उपयोगी पडलेला आहे. वाहतुकीवरचे निर्बंध तर पूर्णपणे पोलिसांमुळे आहेत. पोलिसांनी यासाठी कंट्रोल रूम ते थेट रस्त्यावर बंदोबस्ताची यंत्रणा अखंडपणे राबवली आहे.पोलिस नियंत्रण कक्षात 100 नंबरला संलग्न असणारे नऊ फोन आहेत. त्यावर तीन पाळ्यात पोलिस कर्मचारी असतात. 100 नंबर हा पोलिसांचा नंबर असल्याचे लहान मुलालाही माहिती असल्याने या नंबरवर सातत्याने फोन येत असतात. प्रत्येक फोन गुन्हा किंवा एखाद्या घटनेशी संबंधित नसतो. पण 100 नंबर हा एक आधार वाटत असल्याने लोक पोलिसांशी संबंधित नसलेल्या विषयावरही संचारबंदीच्या काळात बिनधास्त गल्लीच्या कोपऱ्यावर बसलेले तरूण, रिकाम्या रस्त्यावर खेळणारे तरूण, उगीचच मोटासायकलवरून फिरणारे तरूण याच स्वरूपाच्या तक्रारी या काळात अधिक येत आहेत.

या शिवाय या घरात कोणीतरी "पाहुणा' आला आहे. त्याला कोरोना असण्याची शक्‍यता आहे, असेही फोनही कंट्रोल रूमला वाढले आहेत. पोलिस तेथे जातात. कोरोनाचे गांभीर्य नसलेले तरूण पाहून काही पोलिसांचा संयम जरूर सुटतो. मग पळापळ होते. चोर पोलिसांचा खेळ होतो. यातून पोलिसांवरचा ताण अधिकच वाढतो. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहर जरूर शांत आहे. पण, कंट्रोल रूमवरचा ताण मात्र वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com