तीन नातवांनी गाजवली लोकसभा निवडणूक! - three grandsons make loksabha election interesting | Politics Marathi News - Sarkarnama

तीन नातवांनी गाजवली लोकसभा निवडणूक!

योगेश कुटे
मंगळवार, 12 मार्च 2019

माढा, मावळ आणि नगर हे तीन लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत राहिले आहेत. संपूर्ण निवडणूक या तीन मतदारसंघांभोवतीच फिरत आहे की काय, असे वाटत होते. अर्थात त्याला कारणही तसे होते. या तीन मतदारसंघांत तीन नेत्यांच्या नातवांची नावे चर्चेत होती. शरद पवार यांचे नातू पार्थ, बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू सुजय आणि शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू रणजितसिंह यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. 

पुणे : राजकारणात पाहिजे ते मिळवणं ही अवघड गोष्ट असते. आपल्या इच्छेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून निकाल आपल्या बाजूने फिरवणे हे तर तरुणपणात आणखीनच अवघड. मात्र पार्थ पवार आणि सुजय विखे पाटील या दोन बड्या नेत्यांच्या नातवांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणारच, हे आपले म्हणणे खरे करून दाखवले. या चर्चेतील तिसरे नातू म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील मात्र राजकारणात अनुभवी असूनही सध्या चाचपडताना दिसत आहेत.

सुजय हे माजी केंद्रीय मंत्री (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव. स्वतः न्यूरोसर्जन असलेले सुजय यांच्या रक्तात राजकारण आहेच. फक्त त्यासाठी त्यांची धीर धरण्याची तयारी नव्हती. वडील काॅंग्रेसचे नेते असताना भाजपचा झेंडा हाती घेण्याचे धाडस त्यांनी दाखविले. वडिलांनी काॅंग्रेस न सोडण्यासाठी समजावून सांगूनही सुजय यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम ठेवला. वडिलांना त्यांच्या निर्णयाला मूकसंमती देण्याशिवाय मार्ग राहिला नाही. मुलगा भाजपमध्ये असताना विखे पाटील आता काॅंग्रेसमध्ये किती काळ राहणार, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसरे नातू पार्थ पवार यांच्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उभे न राहण्याचा निर्णय घेतला. पार्थ यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, असे त्यांचे वडील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आई सुनेत्रा पवार हे दोघेही सांगत होते. मुलाची इच्छा आईवडिलांना पूर्ण करणे आईवडिलांचे कर्तव्य असते, असेही दोघांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पार्थ हे लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत, असे शरद पवार यांनी अनेकदा सांगूनही पार्थ यांचे समर्थक त्यांच्या उमेदवारीविषयी निःशंक होते. पक्षाचा निर्णय़ काहीही होवो पार्थ यांनी मावळ मतदारसंघातील आपले दौरे कमी केलेले नव्हते. त्यांच्यासाठी होणारा आग्रह पाहून मग पक्षानेही त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

या दोघांपेक्षा अनुभवी असलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील मात्र या दोन नातवांच्या तुलनेत थेट निर्णय घेऊ शकले नाहीत. भाजपमध्ये जायचे की राष्ट्रवादीकडूनच माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची, याबाबत द्वीधा मनःस्थित आहे.  वडील विजयसिंह मोहिते यांनी निवडणूक लढवावी की स्वतः उभे राहावे, याविषयी ते साशंक आहेत. त्यामुळे ते अजून स्पष्टपणे बोलत नाहीत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची तीन दिवसांपूर्वी भेट घेतल्यानंतर ते चर्चेत आले. त्या तुलनेत इतर दोघे आधीपासूनच प्रकाशझोतात होते.

सुजय हे आपला किल्ला स्वतः लढवत होते. आपण का निवडणूक लढविणार, हे ठामपणे सांगत होते. पार्थ पवार हे तर मिडियाशी अधिकृतपणे बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांची भूमिकाही कळू शकली नाही. त्यांचा किल्ला आईवडिलांनीच लढविला. रणजितसिंह हे मिडियासमोर येतात पण हसून निघून जातात.

या तिघांनाही घराणेशाहीच्या आरोपांना सामारे जावे लागत आहे. सोशल मिडियात या मुद्याच्या आधारे टीका होत आहे. त्यामुळे मतदार नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देणार की घराणेशाहीचा मुद्दा लक्षात ठेवणार, हे पाहायला हवे.   या तिघांपैकी प्रत्यक्ष लोकसभेत कोण जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे राहील.  

   
  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख