रमेश जारकीहोळी भाजपकडून विरुद्ध लखन जारकीहोळी काॅंग्रेसकडून; तिसऱ्या भावाचाही अर्ज

गोकाकमध्ये पोटनिवडणूक जोरात
रमेश जारकीहोळी भाजपकडून विरुद्ध लखन जारकीहोळी काॅंग्रेसकडून;  तिसऱ्या भावाचाही अर्ज

बेळगाव : जिल्ह्यात तीन मतदारसंघांत होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (ता. 18) शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. त्यानुसार गोकाक मतदारसंघात एकूण 24 अर्ज, अथणीतून 25 अर्ज दाखल झाले आहेत. कागवाडची अंतिम आकडेवारी मिळू शकली नाही. अर्जांची छाननी मंगळवारी (ता. 19) होणार आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी तिन्ही मतदारसंघांत गर्दी झाली होती. सोमवारी गोकाक मतदारसंघातून चौघांनी मिळून बारा अर्ज दाखल केले. रमेश जारकीहोळी (भाजप), लखन जारकीहोळी (कॉंग्रेस) व सतीश जारकीहोळी (कॉंग्रेस) या तिघा भावांनी नऊ अर्ज दाखल केले आहेत.

धजदच्या अशोक पुजारी यांनीही तीन अर्ज दाखल केले. अथणीतून पंधरा जणांनी अर्ज दाखल केले. त्यात महेश कुमठळ्ळी (भाजप) व गजानन मंगसुळी (कॉंग्रेस) यांचा समावेश आहे. या दोघांसह एकूण 15 जणांनी अर्ज दाखल केल्याने एकूण अर्जांची संख्या 25 झाली आहे. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात नागनाथ व्यंकटराव, रसूलसाब नदाफ, विनायक मठपती, अन्नराय हटळी, गुरुपूत्र कुल्लूर, सदाशिव बुटाळे, गुराप्पा दशाळ, सिध्दरामगौडा पाटील, इम्रान पटेल, श्रीशैल हलदमाल यांचा समावेश आहे.

कागवाड मतदार संघासाठी श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) यांनी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी दाखल अर्ज आणि सुधारीत वेळापत्रकानंतर दाखल अर्जांची एकत्रित छाननी मंगळवारी होईल. 21 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिवस आहे. त्यानंतर सर्व मतदारसंघांतील लढतींचे चित्र समजणार आहे. मतदान 5 डिसेंबर रोजी होणार असून 9 डिसेंबरला मतमोजणी असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com