threat to megha pansare, mukta and hamid dabholkar | Sarkarnama

मेघा पानसरे, हमीद- मुक्‍ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याच्या एसआयटीने मेघा पानसरे, हमीद दाभोलकर व मुक्ता दाभोलकर यांना "एक्‍स' दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. त्यांच्यासोबत 24 तास स्पेशल प्रोटेक्‍शन युनिटचा जवान राहणार आहे. अशा प्रकारची सुरक्षा व्हीव्हीआयपी पदाधिकाऱ्यांनाच मिळत असते; पण विशेष बाब म्हणून ही सुरक्षा दिली आहे. 

कोल्हापूर : "गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर तपासात आलेल्या कागदपत्रांमध्ये मेघा पानसरे व हमीद दाभोलकर लक्ष्य आहेत,' अशी माहिती कर्नाटक एसआयटीला डायरीतून मिळाली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याच्या एसआयटीने मेघा पानसरे, हमीद दाभोलकर व मुक्ता दाभोलकर यांना "एक्‍स' दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. त्यांच्यासोबत 24 तास स्पेशल प्रोटेक्‍शन युनिटचा जवान राहणार आहे. अशा प्रकारची सुरक्षा व्हीव्हीआयपी पदाधिकाऱ्यांनाच मिळत असते; पण विशेष बाब म्हणून ही सुरक्षा दिली आहे. 

भाकपचे दिवंगत नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्नुषा मेघा पानसरे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. विविध आंदोलनांद्वारे आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. त्यासाठी यापूर्वीच त्यांनी हत्यारबंद पोलिस कर्मचारी दिला होता; मात्र पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक एसआयटीला संशयितांकडे डायरी सापडली आहे. डायरीत पुढील लक्ष्य मेघा पानसरे, हमीद व मुक्ता दाभोलकर असल्याचा उल्लेख आहे. 

पुण्याच्या एसआयटी विभागाचे प्रमुख कृष्णप्रकाश यांनी मेघा पानसरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, तुम्हाला पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा स्पेशल प्रोटेक्‍शन असलेला जवान सुरक्षेसाठी देत असल्याचे सांगितले. त्यानुसार एक्‍स दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षेसाठी नेमणूक केलेल्या जवानांचा यात समावेश आहे. हा जवान 24 तास त्यांच्यासोबत राहणार आहे. मेघा पानसरे देशभरात जेथे कोठे जातील, तेथे त्यांना ही सुरक्षा मिळणार आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख