thorat should creat sangamner as new district | Sarkarnama

`थोरातांनी पूर्वी पालघरची निर्मिती केली; आता संगमनेर जिल्हा करावा

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 30 जानेवारी 2020

श्रीरामपूर की संगमनेर असा वाद नगर जिल्ह्यात पेटण्याची शक्यता...

संगमनेर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात महसूलमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. मागील कार्यकाळात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली होती. आता नगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करावा, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब यांच्याकडे करण्याचा निर्णय संगमनेर जिल्हा कृती समितीच्या बैठकित घेण्यात आला.

संगमनेरला जिल्हा मुख्यालय म्हणून घोषित करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी यापूर्वी प्रयत्न झाले. पण आता पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याबाबतच्या नियोजनासाठी संगमनेर जिल्हा कृती समितीची बैठक संगमनेरला झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी यापुढे याचा पाठपुरावा जोरात करण्याचा निर्णय घेतला.

या वर्षी उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती होऊ घातली आहे. त्याच धर्तीवर अनेक दिवसांपासून रखडलेला नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लावावा. संगमनेर जिल्हा मुख्यालय म्हणून घोषित करावा, यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा या बैठकीत झाली. या प्रश्नासाठी थोरात यांच्यासमवेत समितीचे सदस्य चर्चा करणार आहेत. त्यांनी विशेष प्रयत्न करून संगमनेरला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या संदर्भात भेट घेण्याचे ठरले.

या मागणीसाठी 2018मध्ये समितीने व्यापक जनआंदोलन उभारून, चार महिन्यांचे साखळी उपोषण केले होते. तसेच दोन लाख सह्यांचे निवेदन व पाठिंब्याचे पत्र व जिल्हा म्हणून संगमनेरच योग्य का, याबाबतचा लेखी अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख