खात्री असूनही थोपटेंचे मंत्रिपद दोनदा हुकले : पहिल्यांदा वडिलांचे आणि आता संग्राम यांचे!

राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. असाच अनुभव भोरच्या थोपटे कुुटुंबाला आहे. मंत्रिमंडळात समावेश होणार याची पूर्ण खात्री असताना मंत्री म्हणून शपथविधीला येण्याचे निमंत्रण संग्राम थोपटे यांना मिळाले नाही. काॅंग्रेसचे निष्ठावंत असलेल्या थोपटे कुटुंबियांचा भ्रमनिरास पहिल्यांदाच झालेला नाही.
anantrao thopate and sangram thopate
anantrao thopate and sangram thopate

पुणे : भोर मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्यानंतरही काॅंग्रेसकडून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने
संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यातून या समर्थकांनी पुणे येथील काॅंग्रेस भवनाची तोडफोड केली. या वेळी संग्राम यांना मंत्रिमंडळात नक्की संधी मिळणार, अशी अपेक्षा या
समर्थकांना होती. मात्र अशा खात्रीच्या संधीने थोपटे कुुटुंबाला दोनदा हुलकावणी दिली आहे.

संग्राम यांचे वडिल अनंतराव थोपटे हे तर आपल्या मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठीचा निरोप घेण्याच्या तयारीत फोनची वाट पाहत होते. प्रत्यक्षात तसा फोन त्यांना आलाच नाही. अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते. ते तब्बल तेरा वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात होते. अनेक खात्यांचा त्यांना अनुभव होता. वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांना मंत्रिमंडळातून कोणी हटवू शकणार नाही, अशी परिस्थिती होती.

बाबरी मशिद पडल्यानंतर राज्यात विशेषतः मुंबईत दंगली झाल्या. त्या वेळी सुधाकरराव नाईक हे मंत्री होते. शरद पवार हे केंद्रात संरक्षणमंत्री होते. नाईक यांनी दंगल व्यवस्थित हाताळली नसल्याचा ठपका ठेवून त्यांना
मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आले. पुन्हा शरद पवार हे त्यानंतर चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. नाईक
यांच्या मंत्रिमंडळात थोपटे हे शिक्षणमंत्री होेते.  त्यावेळचा किस्सा थोपटे यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितला
आहे.

``सहा मार्च 1993 रोजी शपथविधी होणार होता.  मुख्यमंत्री हे स्वतः संबंधित मंत्र्यांना फोन करून
शपथविधीसाठी तयार राहा, असे सांगतात. मी पाच मार्चला सायंकाळी पाचपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट
पाहत होतो. त्यामुळे कोठे बाहेरही गेलो नाही. आपण बाहेर जायचो आणि फोन यायचा, असे वाटायचे. त्यामुळे
कोठे बाहेरही गेलो नाही. त्या दिवशी येणारा प्रत्येक फोन हा शरद पवारांचा असेल, असे वाटायचे. पण तसे
नव्हते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याला मंत्रिमंडळातून वगळलं तर नाही ना, अशी शंका
यायला लागली. मी अस्वस्थ मनाने घरात फेऱ्या मारू लागलो. डोक्यात विचारांच काहूर उठलं होत...``असं थोपटे
यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे.

याच वेळी विलासराव देशमुख त्यांच्याकडे आले. अहो नेते, झाली का शपथविधीची तयारी, असा प्रश्न विलासरावांनी त्यांना विचारला. ड्रेस कोणता घालणार? कडक खादी आणि मरून रंगाच जाकीट ना? छान छान!,``असे विलासराव सुचवत होते. म्हणजे थोपटेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार, याचा पूर्ण विश्वास त्यांना होता. मात्र आपल्याला फोन आला नसल्याचे थोपटे यांनी विलासरावांना सांगितल्यानंतर त्यांनाही धक्का
बसला. तुम्ही मंत्रिमंडळात नसाल तर मी देखील शपथविधीला जाणार नाही, अशी भूमिका विलासरावांनी त्या वेळी घेतली. अनंतरावांनी त्यांची समजूत घालत त्यांना थपथविधीला जाण्यासाठी तयार केले, असे या आत्मचरित्रात म्हटले आहे. कार्यक्षम मंत्री म्हणून नावलौकीक असताना मला का  वगळण्यात आलं, हे मला कळू शकले नाही. मी खूप नाराज झालो, असे थोपटेंनी नमूद केले आहे. अनंतरावांना वगळल्यानंतर भोर तालुक्यात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर झालेल्या मेळाव्यात याविषयी चिडचिड केली. 

या वेळी उत्तर देताना अनंतरावांनी तलवार म्यानात ठेवली आहे. वेळ आल्यास ती काढून हा मावळा लढल्याशिवाय राहणार नाही, हे थोपटे यांचे त्या मेळाव्यातील वाक्य चांगलेच गाजले होते. या वेळी संग्राम यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारी म्यान न करता थेट काॅंग्रेस भवनवर चालविल्या. अनंतरावांच्या त्या वाक्याचा त्या वेळी अनेकांनी निषेध केला. आता संग्राम यांच्या समर्थकांच्या कृतीबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्या वेळी शरद पवार विरुद्ध अनंतराव थोपटे हा संघर्ष जिल्ह्यात गाजत होता. त्यातूनच अनंतरावांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याचे बोलण्यात येत होते. त्यानंतर हा संघर्ष आणखीनच वाढला. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीचे काशिनाथ खुटवड यांनी अनंतरावांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला. त्यामुळे 1999 मध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली असती तर अनंतराव मुख्यमंत्री झाले असते, असे बोलण्यात येत होते. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर अनंतरावांची ती पण संधी हुकली. त्यानंतर 2004 मध्ये अनंतराव थोपटे हे पुन्हा आमदार झाले. राज्यात 2004 मध्ये निवडणूक झाली तेव्हा सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा अनेक काॅंग्रेस आमदारांचा अंदाज होता. त्या वेळी अनंतरावांनी सुशीलकुमारांना पाठिंबा दिला. प्रत्यक्षात उलटेच झाले. ज्या विलासरावांचे थोपटेंशिवाय पान हलत नव्हते ते विलासरावच पुन्हा 2004 मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यांनीही आपल्या जुन्या सहकाऱ्याला मंत्रिमंडळात घेतले नाही. 2009 आणि 2014 मध्ये अनंतरावांचे पुत्र संग्राम हे आमदार झाले. त्यांना दहा वर्षांत संधी मिळाली नाही. 2019 मध्ये तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या होत्या. तेव्हाही काॅंग्रेसने धुडकविल्याची भावना त्यांची झाली. त्यामुळे भोरच्या मावळ्यांनी आपली तलवार काॅंग्रेस भवनामध्ये चालवली. 

या साऱ्या घडामोडींनंतर संग्राम यांना मानाचे स्थान देण्याची तयारी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दाखवली आहे. ती प्रत्यक्षात येते की हा मावळा पुन्हा दुर्लक्षित राहतो, हे पाहावे लागेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com