third front | Sarkarnama

तिसऱ्या आघाडीची पनवेलमध्ये मोर्चेबांधी

संदीप खांडगे-पाटील: सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

नवी मुंबई : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून भाजपासह शेकापच्या नेतेमंडळींनी आपल्या घरातील देव पाण्यात ठेवले असतानाच एमआयएमच्या नेतृत्वाखाली आकाराला येत असलेली तिसरी आघाडी भाजपासह शेकापच्या मनसुब्यांना दे धक्का देण्याची जोरदार तयारी करत असल्याचे चित्र आहे. 

नवी मुंबई : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून भाजपासह शेकापच्या नेतेमंडळींनी आपल्या घरातील देव पाण्यात ठेवले असतानाच एमआयएमच्या नेतृत्वाखाली आकाराला येत असलेली तिसरी आघाडी भाजपासह शेकापच्या मनसुब्यांना दे धक्का देण्याची जोरदार तयारी करत असल्याचे चित्र आहे. 
पनवेल महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा, रामदास आठवलेंचा रिपाइं गट आणि शिवसेना ही महायुती तर दुसरीकडे शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे ही महाआघाडी निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराच्या रणनीतीमध्ये व्यस्त झाली आहे. महायुती आणि महाआघाडीचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच एमआयएमच्या नेतृत्वाखाली आकाराला येऊ लागलेल्या तिसऱ्या आघाडीने महायुती व महाआघाडीची झोप उडविली आहे. 
महायुती आणि महाआघाडीची चर्चा होण्यापूर्वीच गेल्या सहा महिन्यापासून एमआयएमने निवडणुकीकरिता जय्यत तयारी सुरू केलेली आहे. एमआयएम म्हणजे मुस्लिमांचा पक्ष हा शिक्का पुसण्यासाठी स्थानिक भागातील आगरी-कोळी ग्रामस्थ, आंबेडकरी समाज, हिंदुत्ववादी संस्थांना एमआयएममध्ये खेचण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे. एमआयएमचे रायगड जिल्हा प्रभारी हाजी शाहनवाझ खान, पनवेल शहर अध्यक्ष कारी बरकत अली, खारघर अध्यक्ष सय्यद अझम यांच्या नेतृत्वाखाली सध्या एमआयएमची मोर्चेबांधणी सुरू आहे. 
प्रस्थापितांच्या महाआघाडीला आणि महायुतीला शह देण्यासाठी एमआयएमनेही तिसऱ्या आघाडीसाठी कंबर कसली आहे. एमआयएमने प्रकाश आंबेडकरांचा रिपाइं गट, संभाजी ब्रिगेड यांच्याशी तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा केली असून राजाराम साळवींच्या आगरी सेनेलाही तिसऱ्या आघाडीत घेण्याचे एमआयएमने प्रयत्न सुरू केले आहेत. तिसऱ्या आघाडीसाठी सुरू झालेल्या हालचालींमुळे महाआघाडी आणि महायुतीमधील प्रस्थापितांची झोप उडाली आहे. 
एमआयएमच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असुद्दीन ओवेसी, अकबर ओवेसी यांना प्रचारामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी सहभागी करून घेतले जाणार आहे. असुद्दीन ओवेसींच्या सभा व रॅली यामुळे पनवेलमधील मुस्लिम व मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पनवेलमधील कच्छी मोहल्ला, मुस्लिम मोहला यासह काही भागात मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. तळोजा भागातही मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तळोजा, कळंबोली, पनवेल भागातील ठराविक प्रभागांवर एमआयएमने गेल्या काही महिन्यापासून विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पनवेलमध्ये एक लाख मुस्लिम मतदार राहणार असून त्यात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हिंदू-मराठा मतदार, प्रकाश आंबेडकरांच्या रिपाइंच्या जोरावर मागासवर्गीय मतदार आणि राजाराम साळवींच्या आगरी सेनेच्या माध्यमातून स्थानिक आगरी-कोळी मतदारांना आकर्षित करून घेण्याच्या हालचाली एमआयएमने तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख