They are also preparing to fight against me who don't know number of villages in constituency : Sandipan Bhumre | Sarkarnama

मतदारसंघात गावे किती हे माहिती नाही पण माझ्याविरुद्ध लढायची तयारी :  संदीपान भुमरे 

जगदीश पानसरे 
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच शिवसेनेचा गड राहिलेला आहे. 1990  ते 2014 दरम्यान 2009 चा अपवाद वगळला तर पाचही निवडणुकीत इथे शिवसेनेने विजय मिळवला. पैकी चारवेळा विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनाच पैठणकरांनी पसंती दिली.

औरंगाबाद : "  निवडणुका पैशावर जिंकता येत नाहीत, लोकांच्या सुखात, दुःखात सहभागी व्हावं लागंत, त्यांना धीर आधार आणि मदतीचा हात द्यावा लागतो. केवळ पैशावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मुकेश अंबानी देशाचे पंतप्रधान झाले असते. विरोधकांनी माझ्या विरोधात कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेच्या पाठिंब्यावर पैठण मध्ये पुन्हा मीच निवडून  येणार," असा दावा विद्यमान शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. 

जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच शिवसेनेचा गड राहिलेला आहे. 1990  ते 2014 दरम्यान 2009 चा अपवाद वगळला तर पाचही निवडणुकीत इथे शिवसेनेने विजय मिळवला. पैकी चारवेळा विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनाच पैठणकरांनी पसंती दिली. 95 ते 2004 अशा सलग तीन निवडणुकीत विजय मिळवत भुमरे यांनी हॅट्रीक साधली होती. 2009 मध्ये मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादीने बाजी मारत शिवसेनेचा अश्‍वमेध रोखला. 2014 मध्ये शिवसेनेने इथे पुन्हा विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. 

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी मतदारसंघात जोर धरू लागली आहे. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसे अशा सगळ्याच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. तालुक्‍यात  फोडाफाडीच्या राजकारणालाही वेग आला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर संदीपान भुमरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,"  निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी घडणारच. आज माझ्या विरोधात लढण्यासाठी भाजपकडे 17 इच्छूक उमेदवार आहेत. शिवसेनेसह इतर राजकीय पक्षातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्यात आले आहेत. पण उमेदवारी एकालाच मिळणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर चॉकलेट देण्याचे हे धंदे नेहमीच केले जातात. "

" राजकारणात यशस्वी होण्यासाठी फक्त पैसा असून उपयोग नाही. तुम्हाला लोकांचे प्रश्‍न कळाले पाहिजे, ते सोडवता आले पाहिजे. मी 25-30 वर्षापासून राजकारणात आहे, चारवेळा निवडून  आलो कारण मी जनतेच्या सुख-दुःखात धावून जातो. मतदारसंघाशी माझी नाळ जोडलेली आहे." 

" पण आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघातील विकास कामांमध्ये खोडा घालून मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. माझी बदनामी करून स्वःताची राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण तो यशस्वी होणार नाही. आमदारकीचे स्वप्न दाखवून अनेकांना पक्षात ओढण्याची चढाओढ सुरू आहे. त्यांना मतदारसंघात गांव किती आहे, कार्यकर्ते कोणते हे देखील माहित नाही असे लोक माझ्या विरोधात मैदानात उतरले आहेत. 

" माझ्या राजकीय आयुष्यात आतापर्यंत मी कधी कोणाला खोटी आश्‍वासने दिली नाही. काम होणार नसेल तर स्पष्ट सांगतो आणि एकदा शब्द दिला तर त्याचे काम केल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत तालुक्‍यात कधीच झाली नाही इतकी रस्त्याची कामे माझ्या कार्यकाळात सुरू आहेत. त्यामुळे शंभर टक्के नाही पण 90 टक्के तालुक्‍यातील रस्ते पुर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ," असा दावा देखील भुमरे यांनी केला. 

" मी आमदार नव्हतो तेव्हा देखील तालुक्‍यातील अनेक संस्था माझ्या ताब्यात असल्यामुळे लोकांची कामे मला करता आली. मतदारसंघ हेच माझे कुटुंब असल्यामुळे कुणी कितीही वल्गना केल्या तरी पैठणमधून मीच निवडूण येणार  आहे .  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्या हे माझे गाऱ्हाणे नाथ महाराजांनी ऐकावे," अशी अपेक्षा देखील संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख