for these reasons satej patil wanted kolhapur as guardian minister | Sarkarnama

...यासाठी हवे होते सतेज पाटलांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद!

निवास चौगले
बुधवार, 15 जानेवारी 2020

कोल्हापूर ः विधानपरिषद आमदार असूनही मंत्री पद मिळवून राज्याच्या राजकारणात आपला दबादबा सिध्द केलेल्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पालकमंत्रीपदाबाबतच्या सर्व शक्‍यता फेटाळून लावत हेही पद आपल्याकडे खेचून आणल्याने जिल्ह्याच्या राजकारणात ते भारी पडल्याचे बोलले जाते.

कोल्हापूर ः विधानपरिषद आमदार असूनही मंत्री पद मिळवून राज्याच्या राजकारणात आपला दबादबा सिध्द केलेल्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पालकमंत्रीपदाबाबतच्या सर्व शक्‍यता फेटाळून लावत हेही पद आपल्याकडे खेचून आणल्याने जिल्ह्याच्या राजकारणात ते भारी पडल्याचे बोलले जाते.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या कोल्हापूर दक्षिणमधून श्री. पाटील इच्छुक होते, पण विधान परिषद आमदाराला विधानसभेची उमेदवार नसल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले. त्यानंतर श्री. पाटील यांनी स्वतःऐवजी पुतणे ऋतुराज यांना रिंगणात उतरवून त्यांना निवडूनही आणले. निवडणुकीत जिल्ह्यातून कॉंग्रेसचे चार आमदार निवडून आले. तत्पुर्वीच जिल्हाध्यक्ष पदावर श्री. पाटील यांची वर्णी लागली होती, त्यामुळे या विजयाचेही श्रेय त्यांनाच जाते.

राज्यात ज्यावेळी भाजपाला घालवण्यासाठी शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली, त्याचवेळी श्री. पाटील यांचे मंत्रीपद निश्‍चित होते, तथापि त्यात त्यांच्या विधानपरिषद आमदारकीचा अडथळा होता. कॉंग्रेसने पूर्ण बहूमत असतानाही अपवाद वगळता कधी विधानपरिषद आमदाराला मंत्रीपदाची संधी दिली नव्हती. पण त्यालाही सतेज पाटील अपवाद ठरले आणि मंत्री झाले.

मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली. कोल्हापुरात कॉंग्रेसचे आमदार जास्त असल्याने कोल्हापुरचे मंत्रीपद कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे गेले, त्यातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापुरचे पालकमंत्रीपदी तर सतेज पाटील यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. पण ज्यादिवशी या नियुक्‍त्या झाल्या त्याचदिवशी श्री.थोरात यांनी आपण यासाठी उत्सुक नसल्याचे सांगितल्याने पुन्हा पालकमंत्री कोण, याची चर्चा रंगली. त्यातून कॉंग्रेस व राष्ट्रवादीत जिल्ह्यांची आदलाबदल होऊन राष्ट्रवादीच्या वाट्याला कोल्हापूर येईल व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती होईल असे वाटत होते. श्री. मुश्रीफ यांनी त्यासाठी जोरदार फिल्डींग लावली होती, त्यातून मुश्रीफ-सतेज यांच्यात कधी टोलेबाजी तर कधी सुप्त संघर्षही पहायला मिळाला. अखेर या पदावर सतेज यांचीच निवड झाल्याने ते सर्वच पातळ्यांवर भारी पडल्याचे स्पष्ट झाले.

प्रशासकीय यंत्रणा ताब्यात

मंत्री झाल्यानंतर एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यातून काही ठराविक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी तर मोठी रस्सीखेच पहायला मिळते. कोल्हापुरच्या पालकमंत्री पदाबाबतचा अनुभवही काहीसा तसाच आहे. जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणेवर पालकमंत्री या नात्याने एक वचक आणि वर्चस्व ठेवण्याची संधी मिळते, त्यातून अधिकार वाणीने काही गोष्टी करून घेता येतात. त्यामुळे आपल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी मंत्र्यांची धडपड सुरू असते. त्यात सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख