There Was reason to oppose SRA Schemes in PCMC | Sarkarnama

म्हणून "एसआरए'ला विरोध- सीमा सावळे

उत्तम कुटे - सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 मार्च 2017

पिंपरी-चिंचवडमधील यापूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प शहराबाहेर सेक्‍टर 22, निगडी येथे आणि "रेड झोन'मध्ये राबविल्याने त्याची चीड आल्याने त्याला आपण विरोध केला होता. तसेच या योजनेत मोफत घर देणे आवश्‍यक असताना त्यासाठी प्रत्येकी पावणेचार लाख रुपये घेतल्याने आपण त्याला न्यायालयात आव्हान दिले होते.

पिंपरी-चिंचवडमधील यापूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प शहराबाहेर सेक्‍टर 22, निगडी येथे आणि "रेड झोन'मध्ये राबविल्याने त्याची चीड आल्याने त्याला आपण विरोध केला होता. तसेच या योजनेत मोफत घर देणे आवश्‍यक असताना त्यासाठी प्रत्येकी पावणेचार लाख रुपये घेतल्याने आपण त्याला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, संरक्षण मंत्रालयाने "रेड झोन'ची हद्द कमी केली, तर या प्रकल्पाला आता आपला विरोध राहणार नाही'', असे उद्योगनगरीच्या भाजपच्या स्थायी समितीच्या पहिल्या नवनिर्वाचित मागासवर्गीय अध्यक्षा सीमा सावळे यांनी स्पष्ट केले आहे. स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार हाच आपला अजेंडा राहणार आहे, असे सावळे म्हणाल्या. शहर भ्रष्टाचारमुक्त करायचे असल्याने घोटाळेबाजांनी सावध राहावे, भ्रष्टाचाऱ्यांना माफी नाही, असा एल्गार त्यांनी केला. पालिका अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताच्या भ्रष्टाचारावर आपला पहिला घाव असेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

सावळे म्हणाल्या,"पारदर्शी कारभारावर आपला भर राहणार असल्याने स्थायीच्या सभागृहात "सीसीटीव्ही' बसविणार आहे. स्थायीच्या सभेला पत्रकारांना बसू देण्याबाबत तूर्तास तांत्रिक अडचण असल्याने त्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार आहे. तसेच स्थायीच्या केबीनला असलेल्या गडद काचा बदलून त्या पारदर्शक बसविणार आहे. कामाचा प्राधान्यक्रम ठरविला नसला,तरी मूलभूत सुविधा देण्यावर आपला भर राहणार असून शहरात झालेल्या विकासातील असमतोल दूर करणार आहे.''.

मोटार नाकारणाऱ्या दुसऱ्या पदाधिकारी
पालिकेत सत्तेत येताच भाजपचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी पालिकेची मोटार नाकारली. त्यांच्यानंतर सावळे यांनीही अशी मोटार घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे 12 लाख रुपयांची बचत होणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे या दोघा पालिका पदाधिकाऱ्यांनतर लवकरच होऊ घातलेल्या विषय समित्यांचे सभापतीही अशी पालिकेची मोटार घेतात की नाकारतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सावळे उवाच
* करदाता हा महापालिकेचा खरा मालक
* पालिकेतील उधळपट्टीला लगाम आणि उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न
* तिजोरीत जमा होणाऱ्या एकेक रुपयाचा योग्य विनियोग होईल
* अनावश्‍यक खर्चांना कात्री, महत्त्वाच्या कामानांच प्राधान्य
* सुडाचे राजकारण नाही
* विरोधी पक्षांनाही विश्‍वासात घेऊ

 मी नवीन आहे अजून
"विठ्ठलमुर्ती आणि शवदाहिनी घोटाळ्यात भ्रष्टाचार झाला असल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन पोचले असल्याने त्यातील दोषींविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. स्थायी समितीवर यापूर्वी काम केलेले नसल्याने ही कमिशन समिती आहे का किंवा येथे टक्केवारी घेतली जाते का कसे याबाबत काही माहिती नाही''
-सीमा सावळे

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख