"त्यांनी' संभाजीमहाराजांचे विचारही आचरणात आणावेत - इम्तियाज जलील

"त्यांनी' संभाजीमहाराजांचे विचारही आचरणात आणावेत - इम्तियाज जलील

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराजांचे नाव चिखलठाणा विमानतळाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचे मी स्वागतच करतो. संभाजी महाराजांचे कार्य खूप मोठे आहे, त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारणच नाही. पण केवळ त्यांच्या नावाचे स्मारक किंवा एखाद्या विमानतळाला नाव देऊन चालणार नाही, तर त्यांचे विचार देखील त्यांच्या नावाचा आग्रह धरणाऱ्यांनी आचरणात आणले पाहिजेत असा टोला एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी लगावला आहे. 

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढील टप्यात शहराचे नाव देखील संभाजीनगर करण्याचा विचार सरकार करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली. इम्तियाज जलील म्हणाले, कोणत्याही महापुरुषांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. एखाद्या व्यक्तीचे नाव देण्याचा जेव्हा आपण आग्रह करतो तेव्हा ती व्यक्ती तेवढ्या उंचीची निश्‍चितच असते. संभाजी महाराज यांचे शौर्य, त्यांनी जिंकलेल्या लढाया याचा इतिहास खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला देण्याचा जो निर्णय सरकारने घेतला आहे त्याचे मी स्वागत करतो. 

पण विमानतळाला नाव देण्यापेक्षा लढाया जिंकण्यात पारंगत असलेल्या संभाजी महाराज्या नावाने एखादी एनडीए सारखी संस्था मराठवाडा किंवा महाराष्ट्रात उभारून तिला जर त्यांचे नाव दिले असते तर ते अधिक संयुक्तिक आणि योग्य ठरले असते. महापुरुषांच्या नावांचा आग्रह धरायचा आणि त्या आधारे आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, स्वार्थ साधायचा हे प्रकार चीड आणणारे आहेत. विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव दिले तसेच ज्या डॉ. रफिक झकेरिया यांच्या प्रयत्नातून हे विमानतळ तयार झाले, हे शहर नावारुपाला आले त्यांचे नाव देखील एखाद्या संस्थेला दिले जावे अशी माझी अपेक्षा आणि मागणी आहे. महापुरुषांच्या नावाचा आग्रह धरायचा, कृती मात्र नेमकी उलटी करायची हा दुटप्पीपणा कशासाठी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे, त्यांचा नावाने स्मारक, संस्था उभारायच्या आणि दुसरीकडे त्यांच्या संविधानाला जुमानायचे नाही हे कसे चालेल असा चिमटा देखील इम्तियाज जलील यांनी काढला. 

अनेकांच्या बायोडाट्यात नामकरण हेच काम.. 
औरंगाबादच्या राजकारणात काही मंडळी अशी आहेत, की ज्यांनी वर्षानुवर्षे सत्ता, मंत्रीपदे भोगली. पण त्यांच्या बायोडेटामध्ये शहराच्या किंवा जिलह्याच्या विकासासाठी काय केले यांची नोंद आढळणार नाही, तर याला नाव द्या, त्याला नाव द्या, संभाजीगर करा यासाठी किती आंदोलन केली हेच लिहलेले असेल. अशा सगळ्यांनीच जर त्यांना आपल्या नेत्याबद्दल प्रेम असेल तर सरकारी पैसा न घेता निधी उभारून त्यांची स्मारक उभारावीत असा टोला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नियोजित स्मारकावरून शिवसेना-भाजपला लगावला. सरकारी पैशातून करायचेच असेल तर त्यांच्या नावाने एखादी चांगली शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालय उभारा असा सल्ला देखील इम्तियाज जलील यांनी दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com