ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शिवसेनेबरोबर युतीस तयार 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्वबळावर ताकद अजमावण्यापेक्षा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी युती-आघाडीबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शिवसेनेबरोबर युतीस तयार 

ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्वबळावर ताकद अजमावण्यापेक्षा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी युती-आघाडीबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. 

भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेबरोबर युती करण्याची तयारी दर्शविली आहे; तर कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रस्ताव प्रदेश कॉंग्रेसपुढे पाठवला आहे. शिवसेनेकडून युतीबाबत अंतिम निर्णय मातोश्रीवर घेतला जाणार आहे; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून 14 नोव्हेंबरनंतर भूमिका जाहीर केली जाणार आहे. 

सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय ताकद भाजप आणि शिवसेनेची आहे. या दोघांमध्येच मुख्य लढत होण्याची अपेक्षा असतानाच, भाजपचे खासदार व ठाणे विभागीय अध्यक्ष कपिल पाटील यांनी शिवसेनेपुढे युती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे; तर शिवसेनेचे भिवंडी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी युतीचा अंतिम निर्णय मातोश्रीवरून होणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करीत आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही निवडणुकीत काम करू, असे जिल्हाप्रमुख पाटील यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा परिषदेमध्ये दहा वर्षांपासून कॉंग्रेसचा एकही सदस्य नव्हता. केवळ पंचायत समितीत दोन सदस्यांची निवड झाली होती; मात्र आता पक्षाकडे चांगल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. भिवंडीत आज बैठक होणार आहे. त्यात निवडणुकीबाबत चर्चा होईल, असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडीची आमची तयारी आहे. त्याबाबत प्रदेश कॉंग्रेसकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कपिल पाटील, किसन कथोरे यांच्यासारखे दिग्गज पक्षाबाहेर पडल्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आव्हान आहे. 

तालुक्‍यात मुरबाड आणि शहापूरमध्ये पक्षाची स्थिती काहीशी चांगली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहापुरात आमदार आहे. या परिस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत 14 नोव्हेंबरला बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना बोलाविण्यात आले आहे. 

या बैठकीत आघाडीबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे; मात्र कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत आघाडीनेच निवडणूक लढवण्याबाबत पक्षात अनुकूलता असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक शिवसेनेबरोबर युतीने लढवण्याची भाजपची तयारी आहे. 
- कपिल पाटील, खासदार, ठाणे विभागीय अध्यक्ष, भाजप 

जिल्हा परिषदेतील युतीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जाईल, 
- प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com