ठाणे जिल्हा परिषद : भाजपला शह देण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली 

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे ग्रामिण भागात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे जिल्हा परिषद : भाजपला शह देण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली 

भिवंडी : ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे ग्रामिण भागात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिवंडी तालुक्‍यात शिवसेना व भाजप पक्षाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे कॉंग्रेस सतर्क झाली आहे. शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी कॉंग्रेसचे काही नेते समविचारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महायुती करण्याची तयारीत आहे. 

कॉंग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी निवडणूक लढविण्याबाबत नुकतीच विशेष पदाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा संदेश दिला आहे. भिवंडी व नांदेड महानगरपालिकेचा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सुरेश टावरे यांनी मुस्लिम मतावर डोळा ठेऊन व्युहरचना सुरू केली आहे. 

गेल्या वर्षभरापासून ग्रामीण भागातील भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांनी 
तालुक्‍यात आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले आहेत. त्यामधून मिळालेल्या प्रतिसादाचा या निवडणुकीत निश्‍चित फायदा होणार आहे, अशी माहिती पदाधिकारी देत आहेत. तर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते आपल्या पारड्यात पडण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेऊन मनसेसह अन्य समविचारी पक्षांशी महायुती आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे.

या बाबतीत बोलणी सुरू आहे. भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये भाजप व शिवसेनेचे वर्चस्व आहे, असे असले तरी पदाधिकारी कार्यकत्यांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती करू नये, असा आग्रह काही पदाधिकारी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे करू लागले आहेत.

त्यामुळे भाजपाचे ठाणे जिल्हा विभागाचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी तातडीने सतर्कता दाखवित या निवडणुकीत सेना भाजप युती व्हावी यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारीसुद्धा प्रदेशस्तरावर वरिष्ठांकडे राष्ट्रवादीसह मनसे, श्रमजीवी संघटना, कुणबी सेना, आरपीआय अशा समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. 

भाजपा शह देण्यासाठी वेळ पडल्यास शिवसेनेसह इतर पक्षांची एकत्र महाआघाडी करणे, असे दोन पर्याय दिल्याची तालुक्‍यात चर्चा आहे. गेल्या वर्षापासून भाजपास एकटे पाडण्यासाठी भिवंडीतील स्थानिक पुढाऱ्यांचे प्रयत्न सुरू असून यासाठी सर्व पक्षीय पुढाऱ्यांच्या बैठकादेखील झाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या गटात खळबळ निर्माण झाली असून राज्यातील युतीचे चित्र जिल्हा परिषदेत दिसावे यासाठी ग्रामिण भाजपा खासदार कपिल पाटील प्रयत्नशील आहे. 

नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी व एकटे पाडण्यासाठी 
शिवसेनेने कॉंग्रेस पक्षासह सर्व पक्षांना सोबत घेऊन महायुती केली. त्याचा फायदा शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मिळाला. अन्य पक्षांना खातेसुद्धा उघडता आले नाही. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा महायुती करण्यासाठी कोणी जास्त इच्छुक नसल्याचे मनसेचे पदाधिकारी सांगत आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पक्ष बदलांचा कार्यक्रम भिवंडी तालुक्‍यात जोरात सुरू आहे. पदाधिकाऱ्यांना भाजपचे आकर्षण आहे. त्यामुळे याचा जास्त फटका शिवसेनेला बसला आहे. 

कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा विचारात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे यांनी दिली. मात्र वरिष्ठांशी पुढील चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही सांगितले. 

सध्या ग्रामिण भागात भाजप व शिवसेनेचे अधिक वर्चस्व आहे. त्यामुळे ही ताकद अशीच कायमस्वरूपी रहावी यासाठी एकत्रीतपणे निवडणुका लढण्यावर भाजप खासदार पाटील यांचा विशेष प्रयत्न आहेत. वरिष्ठांनी निर्णय जाहीर केल्यानंतरच निवडणुकीचा धुरळा उडेल, अशी प्रतिक्रीया कार्यकर्त्यांतून उमटत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com