राधेश्‍याम मोपलवारांकडे दहा कोटींच्या खंडणीची मागणी!  - Thane news Radheshyam Mopalwar | Politics Marathi News - Sarkarnama

राधेश्‍याम मोपलवारांकडे दहा कोटींच्या खंडणीची मागणी! 

श्रीकांत सावंत 
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्यासाठी त्यांच्याकडून दहा कोटीची खंडणी मागणाऱ्या सतीष मांगले आणि त्याची पत्नी श्रद्धा मांगले यांना ठाणे पोलीसांनी रंगेहात अटक केली. 

ठाणे : राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्यासाठी त्यांच्याकडून दहा कोटीची खंडणी मागणाऱ्या सतीष मांगले आणि त्याची पत्नी श्रद्धा मांगले यांना ठाणे पोलीसांनी रंगेहात अटक केली. 

डोंबिवलीच्या पलावा सीटीमध्ये राहणाऱ्या या दांपत्याने राधेश्‍याम मोपलवर यांना ब्लॅकमेल करून दहा कोटींची रक्कम मागीतली होती. परंतु ती रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर 31 ऑक्‍टोबर रोजी फोन करून त्यांनी सात कोटी रुपयांची रक्कम खंडणी म्हणून देण्याचे कळवले होते. या फोनचा संवाद मोपलवार यांनी ठाणे पोलिसांना दाखवल्यानंतर ठाणे पोलिसांचा एक पोलीस कर्मचारी एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन डोंबिवलीतील मांगले यांच्या घरी गेला होता. या सापळ्यामध्ये मांगले दांपत्य सापडले असून त्यांचे अन्य दोन साथीदार फरार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. 

महाराष्ट्र शासनाचे सनदी अधिकारी मोपलवार यांच्या विरोधात सतीष मांगले या व्यक्तीने भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यासाठी त्यांच्याकडून एक ध्वनीफितही प्रसिध्द करण्यात आली होती. ही ध्वनीफित विविध माध्यमांनी प्रशारित केली होती. सतीष मांगले याची पत्नी श्रध्दा मांगले विविध राजकीय पक्षांच्या राजकीय नेत्यांना भेटून तसेच प्रसार माध्यमांकडे सातत्याने जाऊन मोपलवार यांच्याविरुध्द आरोप करित होत्या. शासकिय कार्यालयांमध्येही या दांपत्याने मोपलवार यांच्या विरोधात तक्रारी केल्याची माहिती ठाणे पोलीसांनी दिली आहे. 

राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक असताना मोपलवार यांच्यावर झालेल्या अशा प्रकारच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्यांच्याकडून त्यांची तपासणी सुरू आहे. त्याच काळात 23 ऑक्‍टोबर रोजी सतीष मांगले, श्रध्दा मांगले आणि त्यांचा मित्र अनिल वेदमेहता यांनी मोपलवार यांच्या ओळखीच्या क्‍लिंग मिश्रा यांच्यामार्फक संपर्क साधून नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे भेट घेतली. त्यावेळी मोपलवार यांच्या विरोधातील सर्व आरोप परत घेण्यासाठी तसेच त्याच्याकडील सर्व ध्वनीफिती परत करण्यासाठी त्याने मोपलावर यांच्याकडे दहा कोटींची खंडणी मागितली. 

त्यानंतर शांघरीला हॉटेल, वरपे भिवंडी येथेही पुन्हा चर्चाकरून मागणी कायम ठेवली होती. त्यानंतर 31 ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील जे. डब्ल्यू. मेरीअट कॅफे हॉटेलमध्ये या दांपत्याशी भेट घेतल्यानंतर 7 कोटी रुपयांची तडजोड करण्यात आली होती. हे सात कोटी न दिल्यास पोलीसांकडे तक्रार करून मोपलवर यांची मुलगी तन्वी हिच्या जीवाला धोका निर्माण करण्याची धमकी या आरोपींनी दिली होती. त्यासाठी त्यांनी गवळी टोळीचे नाव पुढे केले होते. हा फोनवरील संवाद मोपलवार यांनी पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून या दांपत्याला डोंबिवली पलावा येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. 

पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त गुन्हे मकरंद रानडे. पोलीस उप आयुक्त गुन्हे सुनिल भारद्वाज, सहा. पोलीस आयुक्त शोध दोन एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांनी ही कारवाई पार पाडली. 

मोपलवारांच्या घटस्फोटाच्या काळात आरोपीशी ओळख... 
राधेश्‍याम मोपलवार आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाल्यानंतर मोपलवार यांनी प्रायव्हेट डिटेक्‍टिव्हचे काम करणाऱ्या आरोपी सतीश मांगले यांची मदत घेतली होती. तेव्हापासून सतीश मांगले मोपलवार यांच्या संपर्कात होता. दहावी शिकलेला सतीश याने कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमाचे शिक्षण सुरू केले. परंतु तेही अर्धवट सोडून देऊन तो डिटेक्‍टीव्हचे काम करत होता. तेव्हापासून मोपलवार यांचे फोन रेकॉर्ड करण्याची सवय त्याला लागली होती. या फोन रेकॉर्डमध्ये तांत्रिक गफलती करून त्याने ती ध्वनीफित प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवली होती. 

यापुर्वीही त्याने असे प्रकार केले असून बांद्रा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मिरारोड येथील एका बलात्काराच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. त्याची पत्नी श्रध्दा मांगले ही त्याची दुसरी पत्नी असून ती चित्रपट अभिनेत्रीही आहे. 

गुरूवारी खंडणीचे एक कोटी तीनेच स्विकारले होते. ते सध्या डोंबिवलीतील मानपाडा-निळजे येथील लोढा पलावा मधील रिव्हर व्ह्यु एफ या इमारतीमध्ये सतराव्या मजल्यावर भाड्याने राहत होते. खंडणी विरोधी पथकाने त्यांना रंगेहात पकडून दोन लॅपटॉप, 5 मोबाईल हॅण्डसेट, 4 पेनड्राईव्ह, 15 सीडी. आणि अन्य अक्षेपार्ह कागदपत्रे जमा करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे पोलीसांकडून देण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख