Thane NCP agitation | Sarkarnama

ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आंदोलन

सरकारनामा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

आज युती सरकारच्या काळात लहान मुली, तरुणी, महिला असुरक्षित असल्याचेच स्पष्ट होत आहे.
- सुजाता घाग, ठाणे शहर महिलाध्यक्षा

ठाणे :  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या टॅक्‍सीचालकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज ठाण्यात आंदोलन करण्यात आले.

सुप्रिया सुळे काल देवगिरी एक्‍स्प्रेसने प्रवास करत होत्या. सुळे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कुलजीतसिंह मल्होत्रा नावाचा टॅक्‍सीचालक दादर टर्मिनस येथे गाडीत प्रवेश करीत प्रवाशांना भाड्यासाठी हुज्जत घालत होता. मल्होत्राने सुप्रिया सुळेंना गाठले आणि तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. सुळे यांनी त्याला दोनदा नकार दिला. मात्र, मल्होत्रा ऐकेचना. त्याने सुप्रिया सुळेना पुढे जाऊ न देता अडवून धरले.

या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. ठाणे महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली काळ्या साड्या परिधान करून निदर्शने केली. या वेळी महिला आंदोलकांनी गृहखात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली; तसेच जो प्रकार मुंबईत घडला; तसाच प्रकार ठाण्यातही घडण्याची शक्‍यता असल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन या वेळी प्रशासनाला देण्यात आले.

या आंदोलनात नगरसेविका प्रमिला केणी, अपर्णा साळवी, आरती गायकवाड, वहिदा खान, अंकिता शिंदे, फरझाना शेख, आशिरन राऊत, रूपाली गोटे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. ज्योती निंबरगी, शशिकला पुजारी, युवती अध्यक्षा प्रिंयका, महाराष्ट्र प्रदेश संघटिका सेवादल सोनार विजया दामले, विधान सभाध्यक्ष मेहरबानो पटेल, पूनम वालीया कांता गजमल आदी सहभागी झाले होते.

सुप्रिया सुळे यांच्यासारख्या व्यक्तीला जर टॅक्‍सीचालक असा त्रास देत असतील तर सामान्य महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसत आहे. आज युती सरकारच्या काळात लहान मुली, तरुणी, महिला असुरक्षित असल्याचेच स्पष्ट होत आहे.
- सुजाता घाग, ठाणे शहर महिलाध्यक्षा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख