आमदार प्रताप सरनाईक यांनी 'बिट्टू बाॅस'ला घेतले दत्तक

काही दिवसापूर्वी ठाण्याच्या येऊर जंगल परिसरात सकाळी 'मॉर्निंग वॉक' करताना जंगलात एका प्राण्याचा आवाज येत होता. या भागाच्या नगरसेविका परीषाताई सरनाईक या त्याच परिसरात मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना व इतरांना हा बिबट्याचा लहान बछडा असल्याचे लक्षात आले. त्यावेळी तात्काळ वन विभागाने येऊन या बछड्याला ताब्यात घेतले होते.
Thane Mla Pratap Sarnaik Adpots Leopard Cub
Thane Mla Pratap Sarnaik Adpots Leopard Cub

ठाणे : ठाण्याच्या येऊर जंगलात आईपासून ताटातूट झालेल्या एका बिबट्याच्या बछड्याला आता पालक मिळाले आहेत. आईपासून ताटातूट झालेल्या या बिबट्याच्या बछड्याला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतले असून आज त्यांचा मुलगा युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त या बछड्याला 'बिट्टू बॉस' हे नाव देण्यात आले आहे. 

या बछड्याच्या आजीवन संगोपनाची सर्व जबाबदारी सरनाईक कुटुंबाने घेतली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली येथे राज्य सरकारच्या 'वन्यप्राणी दत्तक योजने' अंतर्गत प्रताप सरनाईक यांनी या बछड्याला अधिकृतपणे आज दत्तक घेतले. हा वन्यप्राणी दत्तक घेत असल्याचे प्रमाणपत्र वनविभागाने सरनाईक यांना सुपूर्द केले.

काही दिवसापूर्वी ठाण्याच्या येऊर जंगल परिसरात सकाळी 'मॉर्निंग वॉक' करताना जंगलात एका प्राण्याचा आवाज येत होता. या भागाच्या नगरसेविका परीषाताई सरनाईक या त्याच परिसरात मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना व इतरांना हा बिबट्याचा लहान बछडा असल्याचे लक्षात आले. त्यावेळी तात्काळ वन विभागाने येऊन या बछड्याला ताब्यात घेतले होते. या बछड्याला जंगलात त्याच्या आईची भेट व्हावी म्हणून दिवस जंगलात मुक्तपणे सोडण्यात आले होते , मात्र या बछड्याची त्याच्या आईशी भेट होऊ शकली नाही. 

तेव्हापासून या बछड्याची चिंता स्वतः प्रताप सरनाईक व त्यांच्या सर्व कुटुंबियांना होती. परीषा सरनाईक यांच्याच प्रभागात हा बछडा त्यांना सर्व प्रथम दिसून आला होता त्यामुळे त्याची काळजी सरनाईक कुटुंबाला लागून होती.

अखेर या बछड्याला दत्तक घेण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला. आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली येथे या बछड्याचे नामकरण करण्यात आले. पूर्वेश सरनाईक यांना घरात बिट्टू हे नाव आहे. बिबट्या किंवा वाघ हा जंगलाचा राजा म्हणजेच बॉस आहे. त्यामुळे या बिबट्याच्या बछड्याचे ' बिट्टू बॉस' असे नामकरण करण्यात आले आहे.

हा बिबट्याचा बछडा आईपासून दुरावल्याने डॉक्‍टर पेठे हे त्याची गेले काही दिवस काळजी घेत आहेत. खास अमेरिकेवरून या बछड्यासाठी दुधाची पावडर मागविण्यात आली व त्यातून त्याचे संगोपन सुरु आहे. पुढील एक महिन्यानंतर मांसाहार व इतर आहार बछड्याला देण्यास सुरुवात होणार आहे. हा बछडा जेव्हा मिळून आला तेव्हा 380 ग्रॅम वजनाचा बछडा होता आता त्याचे वजन 1300 ग्रॅम इतके झाले आहे. बिबट्याचा बछडा बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात राहणार आहे असे सरनाईक यांनी सांगितले.

हा बछडा गेले काही दिवस बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात राहत आहे तो आता माणसाळला आहे. आता हा बछडा परत जंगलात गेल्यास इतर मोठे प्राणी त्याला त्रास देऊ शकतात. हा बछडा आता राष्ट्रीय उद्यानात राहणार असून त्याच्या आजीवन संगोपनाची जबाबदारी सरनाईक कुटुंबाने घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com