आमदार गणपत गायकवाड अनधिकृत बांधकामांविरुद्ध सरसावले; कारवाईसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांना पाठींबा! 

जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेसाठी मी त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊनही अभिनंदन केले आहे. अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात गरीब शेतकरी, सामान्य ग्राहक आणि शासन यांचे नुकसान होते.- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व
आमदार गणपत गायकवाड अनधिकृत बांधकामांविरुद्ध सरसावले; कारवाईसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांना पाठींबा! 

कल्याण : कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात गेल्या दीड महिन्यापासून अनधिकृत बांधकामांची नोंदणी बंद केल्याबाबत काही संस्थांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असताना आता कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनीही कल्याणकरांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामांच्या भूमिकेवर लोकप्रतिनिधी कोणतेही भाष्य करत नसून सावध भूमिका घेत असताना गायकवाड यांनी खुलेआम अनधिकृत बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेला जाहीर पाठींबा दिला आहे. 

काही लोकप्रतिनिधींचा 27 गावातील अनधिकृत बांधकांमाना आशीर्वाद असून ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. याबाबत याअगोदरही आपण अनेक पत्रव्यवहात केले होते; पण प्रत्यक्षात कारवाई झाली नाही, अशी खंतही आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या बांधकामांना लावलेला चाप कौतुकास्पद आहे. अनधिकृत बिल्डर कवडीमोल भावाने शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करतात. यात शासनाचा करोडोंचा महसूल बुडत असून ग्राहकांची देखील फसवणूक होत आहे. या विकासकांना प्राप्त झालेल्या पैशावर कोणताही कर नसल्याने त्याचा विनियोग कशा पद्धतीने केला जातो, हादेखील एक महत्त्वाचा प्रश्न असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांची नोंदणी बंद झाली असून, आता पालिका प्रशासनानेदेखील एक पाऊल पुढे घेत अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारावा, असे मतही आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केले. 

नोंदणी बंद झाल्यामुळे सैरभैर झालेले विकासक अनेक बड्या राजकीय नेत्यांकडे खेटा मारत आहेत. तसेच 27 गावांतील अनधिकृत बांधकामाबाबत माध्यमातून वारंवार जनजागृती केली असल्याने ग्राहकही आता या भागात घर खरेदी करताना सावध पवित्रा घेत असून केलेल्या बुकिंग परत घेत आहेत. अनधिकृत बिल्डर मात्र ग्राहकांच्या प्रतीक्षेतच असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेसाठी मी त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊनही अभिनंदन केले आहे. अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात गरीब शेतकरी, सामान्य ग्राहक आणि शासन यांचे नुकसान होते. 
- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com