ग्रामपंचायत निवडणुकीच्या ईव्हीएम मशिनची छेडछाड : ठाणे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीमध्ये शांततेमध्ये निवडणुका - Thane Grampanchayat Election EVM | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणुकीच्या ईव्हीएम मशिनची छेडछाड : ठाणे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीमध्ये शांततेमध्ये निवडणुका

श्रीकांत सावंत
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सरपंच पदासाठी पहिल्यांदाच थेट निवडणूक करण्याच्या वैशिष्ट्याने नटलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी शांततेमध्ये मतदान झाले. ठाणे जिल्ह्यातील 41 पैकी 33 ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी मतदान घेण्यात आले असून यावेळी काही ठिकाणी निवडणूकीच्या ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. कशेळी गावामध्ये ईव्हीएम मशिन्स बसवण्यात आलेले सिल गायब झाल्यामुळे या भागात मतदान केंद्रामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून तहसिलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन विरोधकांचा अक्षेप नोंदवून घेत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ठाणे : सरपंच पदासाठी पहिल्यांदाच थेट निवडणूक करण्याच्या वैशिष्ट्याने नटलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी शांततेमध्ये मतदान झाले. ठाणे जिल्ह्यातील 41 पैकी 33 ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी मतदान घेण्यात आले असून यावेळी काही ठिकाणी निवडणूकीच्या ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. कशेळी गावामध्ये ईव्हीएम मशिन्स बसवण्यात आलेले सिल गायब झाल्यामुळे या भागात मतदान केंद्रामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून तहसिलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन विरोधकांचा अक्षेप नोंदवून घेत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांमध्ये  या निवडणुका असून 235 सदस्य पदासाठी तसेच सरपंच पदासाठी थेट निवडणूक आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी सकाळपासून मतदानाची प्रक्रीया सुरू करण्यात आली. कल्याण तालुक्यातील गेरसे, कोसले, कुंदे, नांदप, वसंत शेलवली, काकडपाडा, पळसोली, वासुंद्री, वेहळे या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होती. तर भिवंडीतील कासवे, आवळे, आमणे, मकलोकी, दुगाड, कांबे, कारीवली, कशेळी, रवालिंग, खानिवली, कोन, कोपर, कुहे आणि साबे या गावांमध्ये मतदान झाले. तर मुरबाड तालुक्यातील डोंगरनवे, तोंडली, माल, किशोर, साकुर्ली, ससाणे, कोपीवली, कान्होळ, आंबेलेबिके, भदाणे, असोले, वैशाखरे, मोघर या ग्रामपंचायतीमध्ये मतदान घेण्यात आले.

सकाळपासून मतदारांची रिघ मतदान केंद्राबाहेर पहायला मिळत होती. यंदा पहिल्यांदाच सरपंच पदी थेट मतदान पध्दतीने निवडून देण्यात येत असल्यामुळे मतदारांसाठी ही निवडणूक काहीशी वेगळी ठरणारी होती. आदिवासी पाडे आणि ग्रामीण भागामध्ये दिवसभर चांगल्या प्रकारे मतदान झाल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

रविवारी रात्री पासून कर्मचारी मतदान केंद्राच्या ठिकाणी दाखल झाले असल्यामुळे सकाळपासून मोठ्या उत्साहाने मतदान सुरू करण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांचा चोख बंदोबस्त शहरात होता. पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स, होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाडीची घटना...
ईव्हीएम मशिन्समध्ये छेडछाड करणे अशक्य गोष्ट आहे असा दावा निवडणूक आयोगाकडून केला असून कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाणार नसल्याचे अश्वासन देण्यात आले होते. तरही कशेळी येथील ग्रामपंचायतीचे मतनोंदणी घेण्यासाठी आलेल्या ईव्हीएम मशिन्समध्ये छेडछाड झाल्याची तक्रार येथील उमेदवारांकडून करण्यात आली. कशेळीमध्ये सकाळी सहा वाजता पुर्ण प्राथमिक विद्यामंदिर कशेळी येथे ईव्हीएम मशिन्स उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवत असताना त्याचे सिल तुटलेले असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या केंद्रावर पाठवण्यात आलेल्या सात पैकी सहा यंत्रांचे सिल तुटल्यामुळे या विषयी येथील उमेदवारांच्या प्रतिनिधींनी अक्षेप नोंदवाला. याची दखल घेऊन तहसिलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन मतदान रद्द करता येणार नाही, असे स्पष्ट करत उमेदवार प्रतिनिधींचा अक्षेप नोंदवून प्रक्रीया सुरू करण्यात आली.

कशेळी परिवर्तन पॅनलचा अक्षेप..
कशेळी परिसरामध्ये सुमारे 2 हजार 395 मतदार असून या ठिकाणी 27 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. स्वराज्य पॅनल आणि कशेळी परिवर्तन पॅनल अशी दोन पॅनलमध्ये ही निवडणूक होत आहे. 13 आॅक्टोबर रोजी या उमेदवारांच्या पोलिंग ऐजन्टच्या उपस्थितीमध्ये मतपेट्या सिलबंद करण्यात आल्या होत्या. परंतु मतदानाच्या दिवशी सकाळी मतदान केंद्रामध्ये आणलेल्या मतपेट्यांचे सिल तुटल्याचे दिसून आले. त्यामुळे या मतपेट्यांसोबत छेडछाड झाल्याचा अक्षेप कशेळी परिवर्तन पॅनलच्यावतीने करण्यात आला. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रवासा दरम्यान हे सिल तुटल्याचा दावा केला. मतपेट्यांना लावण्यात येणारे सिल हे कोणत्याही प्रकारे तुटत नसून एकाचवेळी सहा पेट्यांची छेडछाड झाल्याचा अक्षेप परिवर्तन पॅनलकडून कैलाश तरे यांनी यावेळी नोंदवला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख