ठाण्यातील नगरसेवक विक्रांत चव्हाणांची बेकायदा संपत्ती; एक कोटीची उसनवारी, गावी बंगला! 

कॉंग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या बेहिशेबी मालमत्ता संपादनामध्ये त्यांची पत्नी, सासू-सासरे आणि कार्यकर्त्यांचाही मोठा हातभार आहे. या कुटुंबीयांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही उत्पन्न नसलेल्या कार्यकर्त्यांनी सुमारे एक कोटी रुपयांची उसनवारीची रक्कम चव्हाण यांच्या खात्यात जमा केली आहे; तर चिपळूणमधील मार्गताम्हाणे गावात सुमारे 56 लाख रुपयांचा बेकायदा दुमजली बंगला बांधला आहे. ठाण्यामध्ये विविध ठिकाणी फ्लॅटसाठी लागलेली रक्कम सासरे रवींद्रन नायर आणि कार्यकर्त्यांच्या खात्यातून गेली आहे.
ठाण्यातील नगरसेवक विक्रांत चव्हाणांची बेकायदा संपत्ती; एक कोटीची उसनवारी, गावी बंगला! 

ठाणे : कॉंग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या बेहिशेबी मालमत्ता संपादनामध्ये त्यांची पत्नी, सासू-सासरे आणि कार्यकर्त्यांचाही मोठा हातभार आहे. या कुटुंबीयांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेषतः कोणतेही उत्पन्न नसलेल्या कार्यकर्त्यांनी सुमारे एक कोटी रुपयांची उसनवारीची रक्कम चव्हाण यांच्या खात्यात जमा केली आहे; तर चिपळूणमधील मार्गताम्हाणे गावात सुमारे 56 लाख रुपयांचा बेकायदा दुमजली बंगला बांधला आहे. ठाण्यामध्ये विविध ठिकाणी फ्लॅटसाठी लागलेली रक्कम सासरे रवींद्रन नायर आणि कार्यकर्त्यांच्या खात्यातून गेली आहे. 

विनायक सोसायटीमध्ये 23 लाखांचा फ्लॅट, शुभंकर सोसायटीमध्ये 40 लाख 25 हजारांचा फ्लॅट, मॅंचेस्टर बिल्डिंगमध्ये 24 लाख 20 हजारांचा फ्लॅट आहे. 
मार्गताम्हाणे गावामध्ये विक्रांत यांच्या वडिलांचे पक्के घर असून, तशी नोंद ग्रामपंचायतीमध्ये आहे; परंतु त्या ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय विक्रांत यांनी बत्तीसशे चौरस फुटांचा दुमजली बंगला बांधला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. 

चव्हाण यांच्याकडे 53 हजारांचा ऍपल 6 मोबाईल असून 17 लाख 26 हजारांची इनोव्हा गाडी आहे; तर 5 लाखांची मुदत ठेव सापडली आहे. 

आरोपींमध्ये समावेश असलेले अनंत घाडगे, महेश शिर्के, परेश रोहित, उमेश कांबळे, संतोष गावडे, प्रकाश भोसले, भास्कर गडामी, महेश शिर्के, परेश रोहत या सर्वांनी मिळून 80 लाख 87 हजार रुपयांची उसनवारी रक्कम दिल्याचे समोर आले आहे. यापैकी अनेक जण सेवानिवृत्त असून त्यांचे मासिक उत्पन्न अवघे अडीच हजार रुपये आहे; तर एक जण वडापावच्या दुकानामध्ये काम करत असून, त्याने 5 लाख रुपये दिले आहेत. 

सासऱ्याकडून लाखोंची उलाढाल 
विक्रांत चव्हाण यांचे सासरे रवींद्रन नायर 1983 मध्ये सौदी आरेबिया येथून वैद्यकीय कारणास्तव भारतात आले. सध्या ते कोणत्याही प्रकारची नोकरी करीत नसून, त्यांचे परदेशातील दोन मुलगे अजित व अनिल त्यांना केवळ 5000 रुपये पाठवतात. 

बॅंकेतील पैशातून येणाऱ्या व्याजावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. असे असताना जावई विक्रांत चव्हाण नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी हॅप्पी व्हॅली येथे 20 लाखांचा फ्लॅट घेतला; तर वर्तकनगर येथील रेनआर्ट येथे 54 लाख 86 हजारांचा फ्लॅट घेतला. 

एका खासगी बिल्डर्सला 60 लाख रुपये दिले; तर पत्नी शांता नायर यांच्या नावावर 71 लाख 60 हजारांचा फ्लॅट खरेदी केला. याशिवाय त्यांच्या खात्यात 55 लाख रुपये, तर पत्नीच्या खात्यात 36 लाख 50 हजार रुपयांचा भरणा केला आहे.

विक्रांत चव्हाण यांची राजकीय पार्श्‍वभूमी 
विक्रांत चव्हाण कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. 2003-04 ते 2008-09 या कालावधीत ते शिक्षण मंडळाचे सदस्य होते. एप्रिल 2012 मध्ये ठाणे महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर एप्रिल 2017 पासून पुन्हा महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक सातमधून निवडणूक लढवून नगरसेवक झाले. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणामध्ये अडकलेल्या चव्हाण यांची जामिनावर सुटका झाली होती. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ठाणे महापालिकेमध्ये सुमन कन्स्ट्रक्‍शन या खासगी कंपनीच्या नावे सब कंत्राटदार म्हणून काम करत होते. नगरसेवक झाल्यानंतर या कंपनीच्या कामावर मर्यादा असतानाही त्यांनी 16 लाख 17 हजार रुपये जमा केले आहेत. 

उत्पन्नापेक्षा 136 पट संपत्ती 
नगरसेवक असताना विक्रांत चव्हाण दाम्पत्याने कायदेशीर वार्षिक उत्पन्न एक कोटी 89 लाख 37 हजार 465 असताना त्यांनी सुमारे दोन कोटी 80 लाख 32 हजारांचा खर्च केला आहे. उत्पन्नापेक्षा 90 लाख 94 हजार 763 रुपयांचा अतिरिक्त खर्च करून एक कोटी 67 लाख 10 हजार 956 रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. अशी सुमारे दोन कोटी 58 लाख पाच हजार 719 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता चव्हाण दाम्पत्याने जमा केली आहे. ही संपत्ती त्यांच्या उत्पन्नापेक्षा हे प्रमाण 136.27 पट अधिक आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com