ठाणे महापालिकेची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ - मुख्यालयात राजरोस फिरताहेत रिव्हॉल्वरधारी 

मुंबई खालोखाल मोठा आवाका असलेल्या ठाणे महापालिकेची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याचा प्रत्यय आला आहे. कर्तव्य कठोर निवृत्त पोलीस अधिकारी पालिकेचा मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून नेमलेला असतानाही पालिकेच्या 'व्हीआयपी' प्रवेशद्वारातून कंबरेला रिव्हॉल्वर लटकवून एक आगंतुक थेट महापालिकेत शिरल्याची घटना नुकतीच घडली.
ठाणे महापालिकेची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ - मुख्यालयात राजरोस फिरताहेत रिव्हॉल्वरधारी 

ठाणे : मुंबई खालोखाल मोठा आवाका असलेल्या ठाणे महापालिकेची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याचा प्रत्यय आला आहे. कर्तव्य कठोर निवृत्त पोलीस अधिकारी पालिकेचा मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून नेमलेला असतानाही पालिकेच्या 'व्हीआयपी' प्रवेशद्वारातून कंबरेला रिव्हॉल्वर लटकवून एक आगंतुक थेट महापालिकेत शिरल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर ही रिव्हॉल्वरधारी व्यक्ती बराच वेळ महापौर व इतर बड्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये असलेल्या पहिल्या मजल्यावर रिव्हॉल्वरचे प्रदर्शन करीत येरझाऱ्या घालीत असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेली मेटल डिटेक्‍टर (धातूशोधक) यंत्रणा गेले अनेक महिने बंद असल्याचे दिसून आले आहे. 

ठाणे महापालिकेचे मुख्यालय पाचपाखाडी येथे असून पालिकेच्या आयुक्तपदी संजीव जयस्वाल हे धडाडीचे आयएएस अधिकारी आहेत. पालिका मुख्यालयात आंतरबाह्य सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे.तर, महापालिकेची सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी मछिंद्र थोरवे यांच्या नियंत्रणाखाली सद्यस्थितीत एकूण 1130 सुरक्षारक्षक तैनात आहेत.यात महापालिकेचे 297 सुरक्षारक्षक,महाराष्ट्र सुरक्षा बोर्डचे 155 आणि उर्वरित भांडुप सुरक्षारक्षक मंडळाचे कर्मचारी सेवा पुरवत आहेत. थोरवे हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांचा पालिकेच्या प्रत्येक घडामोडींवर वॉच असतो. 

असे असतानाही गुरुवारी वर्षा मॅरेथॉनची महत्वाची बैठक महापौरांच्या कार्यालयात सुरु असताना एक आगन्तुक या कार्यालयाबाहेरील व्हरांड्यात चक्क कंबरेला रिव्हॉल्वर लावून येरझाऱ्या घालीत असल्याचे दिसून आले.त्याच्या या शस्त्र प्रदर्शनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र,पालिकेतील एकाही सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला हटकण्याची अथवा विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही.सदरची व्यक्ती बदलापूर येथील असून पालिकेत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भेटण्यासाठी आल्याचे समजले.याबाबत प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांकडे विचारपूस केली असता,पालिकेत भेट देणारे सुरक्षेच्या कामात सहकार्य करीत नाहीत.त्यामुळे नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात. 

दरम्यान,महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्‍टर यंत्रणा गेल्या अनेक महिन्यापासून बंद पडली असल्याचे समोर आले आहे.ठाणे महापालिकेत अनेक मंत्रीमहोदयांसह बडे राजकीय नेते नेहमीच येतजात असतात.तरीही,सुरक्षा व्यवस्थेमधील या ढिलाईबाबत मनपा अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. 

ठाणे महापालिकेत रुजू झाल्यानंतर सुरक्षायंत्रणेला कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला असून सर्व विभागात दैनंदिन तपासणी केली जाते.याशिवाय महापालिकेत येणाऱ्या नागरिकासह प्रत्येक मालमत्तेची कसून तपासणी करूनच आवक-जावक होते. तसेच,याची नोंददेखील ठेवली जाते.तरीही,काही आगळीक घडली असल्यास त्याची चौकशी केली जाईल. 
मच्छिन्द्र थोरवे - ठाणे महापालिका, मुख्य सुरक्षा अधिकारी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com