ठाणे जिल्ह्यात घटलेल्या मतदानाने उमेदवारांमध्ये धाकधुक 

जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांचा अपवाद वगळता मतदानाची आकडेवारी किमान दोन ते चार टक्‍क्‍यांनी घटल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
chavan_shinde
chavan_shinde

ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघांसाठी सोमवारी (ता. 21) मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदार याद्यांतील घोळ, ईव्हीएममधील बिघाड, तुरळक वादावादी वगळता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीकडे पाठ फिरवूनही नागरिकांनी मतदान करण्यात निरुत्साह दाखवला. 

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांत 213 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बहुतांश मतदारसंघांत दुहेरी-तिहेरी लढती झाल्या. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे संजय केळकर, मनसेचे अविनाश जाधव, ओवळा-माजिवडामध्ये शिवसेनेचे प्रताप सरनाईक, कॉंग्रेसचे विक्रांत चव्हाण, मनसेचे संदीप पाचंगे, कोपरी-पाचपाखाडीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, कॉंग्रेसचे संजय घाडीगावकर, मनसेचे महेश कदम यांच्यात लढत आहे; तर कळवा-मुंब्रामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या दीपाली सय्यद आमने-सामने आहेत.


डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण, कॉंग्रेसच्या राधिका गुप्ते, मनसेचे मंदार हळबे, कल्याण पश्‍चिमेत शिवसेनेचे विश्‍वनाथ भोईर, भाजपचे बंडखोर नरेंद्र पवार, मनसेचे प्रकाश भोईर, कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील, शिवसेनेचे रमेश म्हात्रे, कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड, शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे आणि कॉंग्रेसचे प्रकाश तरे यांच्यात लढत आहे.


भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे, कॉंग्रेसच्या माधुरी म्हात्रे आणि मनसेच्या शुभांगी गोवारी अशी तिरंगी लढत आहे. भिवंडी पश्‍चिममध्ये भाजपचे महेश चौगुले, कॉंग्रेसचे शोएब खान, भिवंडी पूर्वमध्ये शिवसेनेचे रूपेश म्हात्रे, कॉंग्रेसचे संतोष शेट्टी, मुरबाडमध्ये राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव, भाजपचे किसन कथोरे, शहापूर येथे शिवसेनेचे पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादीचे दौलत दरोडा यांच्यात; तर अंबरनाथमध्ये शिवसेनेचे बालाजी किणीकर, कॉंग्रेसचे प्रवीण खरात, उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी, भाजपचे कुमार आयलानी यांच्यात लढत आहे.


 मिरा-भाईंदर येथे कॉंग्रेसचे मुझफ्फर हुसेन, भाजपचे नरेंद्र मेहता, ऐरोलीत राष्ट्रवादीचे गणेश नाईक, कॉंग्रेसचे गणेश शिंदे, बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे, मनसेचे गजानन काळे आणि राष्ट्रवादीचे अशोक गावडे अशा प्रमुख लढती होत आहेत. घटलेल्या मतदानाबद्दल दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी कोणाला या घटत्या मतदानाचा फायदा झाला हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.


मतदानाची टक्केवारी घसरली असली, तरी वाढलेल्या मतदारांमुळे हा मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तीन-साडेतीन लाख मतदार असलेल्या मतदारसंघांतील मतदारांची संख्या यंदाच्या निवडणुकीत चार लाखापर्यंत पोचली होती, त्यामुळे परंपरागत मतदार आपल्या बाजूने राहिल्याचा विश्‍वास सत्ताधाऱ्यांना आहे; तर या वेळी नवमतदारही मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याने आम्हालाच जास्त संधी असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

कोपरी पाचपाखाडी

एकनाथ शिंदे, शिवसेना
गेल्या 10 वर्षांत मतदारसंघात कायम विकासकामे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मतदारसंघात बहुतांश जागा ही एमआयडीसीची असल्याने विकासकामे करताना काही तांत्रिक अडचणी येत असतात, पण त्यावर मात करण्यात यश आले. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी काहीही असली, तरी मतदारसंघातील मतदार माझ्या विकासकामांवर यशाची मोहोर नक्की उमटवतील असा विश्‍वास आहे.

संजय घाडीगावकर, कॉंग्रेस
नागरिकांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे. गुरुवारी 24 तारखेला निर्णय होईल, विकास हवा की प्रस्थापित. नागरिकांनी विकासाच्या बाजूने कौल देण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न केले आहेत.

ठाणे शहर

संजय केळकर, भाजप


मतदानाची टक्केवारी वाढणे आवश्‍यक होते. मतदान हे अनिवार्य झाले पाहिजे. ठाणे शहर मतदारसंघ हा सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. अशा वेळी मी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची पोचपावती या वेळी नक्की मिळेल, असा मला विश्‍वास आहे.

अविनाश जाधव, मनसे
विजयाची खात्री आहे. भाजपच्या आमदारांनी काहीही केले नाही. भाजप विरोधात इतर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने या दुरंगी लढतीत विजयाची हमखास खात्री आहे.

ओवळा-माजिवडा
प्रताप सरनाईक, शिवसेना


मतदानाचा टक्का घसरला असला तरी मतदारांची संख्या यंदा वाढली आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. मी गेल्या 10 वर्षांत ओवळा-माजिवडा येथे विविध विकासकामे केलेली आहेत. ही कामे प्रत्यक्षात मतदारांसमोर मांडलेली आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त मताधिक्‍य मिळेल असा विश्‍वास आहे.

विक्रांत चव्हाण, कॉंग्रेस
कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून या मतदारसंघात विजयाची खात्री आहे. या वेळी मतदारसंघात काढलेल्या रॅलीच्या वेळी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निकाल लागेल असा मला विश्‍वास आहे.

मुंब्रा-कळवा
जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी


मुंब्रा परिसरात आठ टक्‍क्‍यांनी मतदान वाढले आहे. या मतदारसंघातील नागरिकांना विकासकामांवर मोहोर उमटवण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यास प्रवृत्त केले होते. त्याचबरोबर कळवा परिसरातील जनतेला मी विकासकामात कोणत्याही प्रकारची हयगय केली नसल्याने जिंकण्याचा विश्‍वास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com