ठाण्यात शिवसेनेच्या पाठबळाने भाजपच्या संजय केळकरांना मार्ग मोकळा !

भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात खरी लढत होणार आहे.
Thane-Kelkar-shinde
Thane-Kelkar-shinde

ठाणे :ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा मराठीबहुल तसेच सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात यंदा इतर अनेक उमेदवार उतरले असले, तरी भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात खरी लढत होणार आहे. 

राष्ट्रवादीने मनसेला या मतदारसंघात पाठिंबा दिला असला, तरी राष्ट्रवादीची मते मनसेच्या इंजिनावर कितपत मोहोर उठवणार याबद्दल सांशकता आहे. त्याच वेळी आजघडीला ठाणे मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून अद्यापही इथे युतीचे प्राबल्य आहे.

ठाणे पूर्णपणे शहरी मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. त्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ पातळीवरील नेते मतदारसंघ ताब्यात येण्यासाठी प्रयत्नशील होते, पण भाजपनेदेखील हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता. ठाण्यातील चारपैकी केवळ ठाणे शहर हा मतदारसंघ भाजपकडे होता. त्यामुळे हा मतदारसंघ गमावण्यास भाजप नेते तयार नव्हते. त्यामुळे भाजपने तो आपल्याकडे ठेवण्याबरोबरच संजय केळकर यांनाच पुन्हा संधी दिली. 

भाजपमधील अनेक पदाधिकारी या मतदारसंघासाठी प्रयत्नशील होते, पण मितभाषी असलेल्या संजय केळकर यांचा विविध विकासकामांचा पाठपुरावा करण्यात असलेले कसब अशा वेळी उपयोगी आल्याचे मानले जाते. त्यामुळेच अनेक नावे चर्चेत असतानाही पक्षनेतृत्वाने त्यांच्यावरच विश्‍वास दाखवला आहे. 

विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे आणि नारायण पवार आता भाजपमध्ये आहेत. त्या वेळी डावखरे यांना 24 हजार आणि नारायण पवार यांना 15 हजार मते मिळाली होती. आता दोघांची ताकद केळकर यांच्यासोबत असल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरली आहे. त्याचबरोबर सर्व मतभेद बाजूला सारून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाण्यातील शिवसेना आता सर्व ताकदीनिशी केळकर यांच्या प्रचारात उतरली आहे.

मफतलाल कंपनीच्या कामगारांसाठी केलेला पाठपुरावा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध योजनांसाठी केलेले प्रयत्न, शहरातील रस्ते रुंद होण्यासाठी केलेले प्रयत्न, शहरातील जुन्या अधिकृत इमारतींचे पुनर्वसन वेगाने होण्यासाठी केलेला पाठपुरावा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. अधिकृत जुन्या इमारतींचा विषय अनेक वर्षे रेंगाळलेला आहे. अशा वेळी त्यांना जास्तीत जास्त चटई क्षेत्र बांधकामासाठी मंजूर होण्यासाठी केळकर यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच आजच्या घडीला शिवसेना आणि भाजपचे तब्बल 20 नगरेसवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात युतीच्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभी आहे.


मनसेचे अविनाश जाधव हे कामय विविध आंदोलनांच्या माध्यमातून जनतेसमोर आलेले आहेत. रस्ते, पाणी या विषयावरून ते वारंवार महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एखादे आंदोलन पुकारले, की त्याची सुरुवात ठाण्यातून करण्याची परंपरा जाधव यांनी सुरू केली आहे.

त्यांना मानणारा त्यांचा स्वतःचा कार्यकर्त्यांचा संच त्यांच्यासोबत आहे, पण शहरात मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. तसेच प्रभागानुसार कार्यकर्त्यांची बांधणी युतीच्या आकडेवारीसमोर अगदी तोकडी आहे. त्यामुळेच त्यांना मनसेच्या वतीने भाजपविरोधात लढा देताना एकट्याने किल्ला लढवण्याची वेळ आली आहे. त्याला कितपत यश मिळेल याबाबत सध्या तरी सांशकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com