भाजप पूर्ण ताकदीनिशी खैरेंच्या पाठीशी - सुरजितसिंग ठाकूर

  भाजप पूर्ण ताकदीनिशी खैरेंच्या पाठीशी - सुरजितसिंग ठाकूर

औरंगाबाद : मराठवाड्यातील सहा ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली तेथे महायुतीचा उमेदवार निवडून येतील. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातूनही महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे मोठ्या मतधिक्‍याने विजयी होतील, भाजप पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरजिंतसिंग ठाकूर यांनी दिली. गेल्या काही दिवसापासून भाजपचे कार्यकर्ते महायुतीचे काम करीत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. सुरजितसिंग ठाकूर म्हणाले, आम्ही नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करीत आहोत. भाजपचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता हा महायुतीचे काम करीत आहे. शिवसेना-भाजपचे पदाधिकारी त्यांना नेमून दिलेली कामे चोखपणे करीत आहेत. 

भाजपने प्रत्येक स्तरावर संघटनात्मक बांधणी मजबूत पद्धतीने केली आहे. प्रत्येक मतदार यादीसाठी एक पेज प्रमुख नेमण्यात आलेला आहे. पाच ते सात बुथसाठी शक्‍ती बुथ प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. संघटनात्मक पद्धतीने केलेल्या या बांधणीवरच पक्ष उभा राहिला आहे. त्यामुळे या यंत्रणेचा फायदा महायुतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांना निश्‍चितच होईल असा दावाही ठाकूर यांनी केला. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे याची जाणीव भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे. तशा स्पष्ट सूचना देखील त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवारा व्यतिरिक्त इतर कुणाचाही प्रचार करत नाहीये, किंवा त्याला पाठिंबाही देत नाही. चंद्रकांत खैरे यांना मिळणारे प्रत्येक मत हे मोदीसाठी असणार आहे. त्यामुळे भाजप पुर्ण ताकतीनिशी खैरे यांच्या पाठिशी उभी असल्याचा विश्‍वास देखील सुरजितसिंग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. 

मोदींचा फोटो, प्रदेशाध्यक्षांच्या नावाचा वापर करणे चुकीचे 
महायुतीचे उमेदवार खैरे यांच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मोदींना पाठिंबा दर्शवत त्यांच्या फोटोचा वापर आपल्या प्रचाराच्या बॅनरवर करायला सुरुवात केली आहे. याकडे ठाकूर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्याचबरोबर ते भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचे नेते देखील आहेत. त्यामुळे प्रचारासाठी त्यांच्या फोटोचा वापर करणे चुकीचे आहे. याची आम्ही नक्कीच दखल घेऊ आणि योग्य ती कारवाई करू. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाचा देखील अपक्ष उमेदवाराकडून चुकीच्या पध्दतीने वापर केला जात असल्याचे सांगत या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका असे आवाहनही ठाकूर यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com