thakre and mumbai project | Sarkarnama

मुंबई-पारबंदर प्रकल्प 2022 पूर्वी मार्गी लागेल - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई : मुंबई-पारबंदर (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) प्रकल्प हा मुंबई-नवी मुंबईला जोडणारा भारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सप्टेंबर 2022 पर्यंत तो पूर्ण होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या समुद्रावरील सर्वांत लांबीच्या पुलाच्या पहिल्या गाळ्याची उभारणी बुधवारपासून (ता. 15) सुरू झाली. ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून गर्डरच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की या प्रकल्पासाठीचा कालावधी 54 महिन्यांचा असला, तरी सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई नवी मुंबईला जोडली जाणार असून राज्यातीलच नव्हे, तर देशातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आदी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी या वेळी प्रकल्पाचे सादरीकरण केले. 
असा आहे प्रकल्प... 
- मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे 22 कि.मी.चा सहापदरी पूल 
- या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 कि.मी., जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 
- हा समुद्रावरील भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल ठरणार आहे. 

प्रकल्पाची सद्यस्थिती 
- जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या अर्थात, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए)कडून प्रकल्पाला कर्जसाह्य 
- तीन स्थापत्य कंत्राटद्वारे आणि एका इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे प्रकल्पाचे काम 
- प्रकल्पाची डिसेंबर 2019 अखेर सुमारे 19 टक्के आर्थिक प्रगती. पुलाच्या पायाचे आणि स्तंभांच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर 
- सेगमेंट कास्टिंग व तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर 
- प्रकल्पाच्या कामाचा कालावधी सुमारे साडेचार वर्षे. सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्णत्वाचे नियोजन. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख