शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता टोकाची भूमिका : उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता टोकाची भूमिका : उद्धव ठाकरे

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी सगळ्यात आधी शिवसेनेने दहा वर्षापूर्वी केली होती. तेव्हाच्या आघाडी सरकारने थातूर-मातूर का होईना कर्जमुक्ती नाही, पण कर्जमाफी दिली. सरकारमध्ये असतानाही आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आग्रही आहोत. मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेत कर्जमुक्ती देण्याचे वचन दिले. आपण दिल्लीला जाऊ असे सांगितले, आम्ही दिल्लीश्‍वराकडे जाऊन आलो, पण त्यांनीही हात वर केले. शेतकऱ्यांचा आणखी अंत पाहू नका ? महिनाभरावर हंगाम आलेला आहे. जुने कर्ज फेडल्याशिवाय शेतकऱ्यांला नवे कर्ज मिळणार नाही. सरकारला खूप वेळ दिला, आता शिवसेना टोकाची भूमिका घेऊन कर्जमुक्तीसाठी शेवटची लढाई लढणार असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला दिला. 

लवकरच शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन "मी कर्जमुक्त होणारच' ही संकल्पना राबवणार असल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले. मराठवाड्यातील शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादेत आले असताना ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. शिवसंपर्क मोहीम ही मध्यवधीची तयारी समजायची का? यावर सध्या माझ्यासमोर निवडणूक नाही तर शेतकरी आहे. निवडणुकीला आणखी दोन वर्ष बाकी आहेत. निवडणुकांशिवाय संघटनात्मक बांधणी होऊ शकत नाही का? संघटनेचे काम करायचे असेल तर बांधणी आवश्‍यक असते. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात शिवसंपर्क मोहीम राबवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

सरकारमधून बाहेर पडण्याची घाई तुम्हाला का? 
शिवसेना सरकारमधून बाहेर कधी पडणार? या प्रश्‍नावर आमच्यापेक्षा सरकारमधून आम्ही बाहेर पडावे याची घाई तुम्हा मिडियावाल्यांनाच अधिक झाली असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. कॉंग्रेस-आघाडीशी बऱ्याच वर्ष लढल्यावर राज्यात व केंद्रांत सत्तांतर झाले आहे. आघाडी सरकारच्या काळात आपण खूप वर्ष वाट पाहिली. एका अपेक्षेने लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे भाजपला थोडा वेळ द्यायला हवा असे सांगत तूर्तास शिवसेनेचा सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. 
समृद्धी महामार्गाचे स्वप्न मोठे चांगले 
नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गांचे स्वप्न मोठं आणि चांगले आहे. आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करून आम्हाला विकास नकोय असे सांगत उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन त्यांना रस्त्यावर आणणारा विकास शिवसेनेला कदापी नको. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा हट्ट धरणाऱ्यांनी मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेन देखील अहमदाबाद ऐवजी नागपूरला घेऊन जावी असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता उद्धवच ठाकरे यांनी लगावले. 
तूर आयात का केली? 
राज्यात व देशभरात तुरीचे बंपर पीक आलेले असताना तूर आयात का केली? नियोजन कोणी केले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्याच्या घरात तूर पडून आहे. मग खरेदी केंद्रावर तूर कोणी विकली याची चौकशी झाली पाहिजे. मुळात सरकारची खरेदी केंद्र उशिरा सुरू होतात, त्यामुळे नाइलाजाने शेतकरी कमी भावात व्यापाऱ्यांना तूर विकतो. मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे. मुदत वाढवा, जाचक अटी शिथिल करा पण शेतकऱ्यांची तूर खरेदी करा. 
जीएसटीमुळे सरकारकडे हात पसरावे लागतील 
जीएसटी लागू केल्यामुळे राज्यांना आता सरकारकडे हात पसरावे लागणार आहेत. त्यामुळे शहरांचा विकास थांबेल. मुळात जीएसटी लागू करताना लहान-मोठ्या शहरांचा स्वतंत्रपणे विचार करायला हवा होता. सगळ्या शहरांना एकाच तराजूत मोजल्याने जीएसटी त्रासदायक आणि विकासकामांना मारक ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हक्कावर या नव्या करप्रणालीमुळे गदा येणार असल्याची भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्य सरकारकडे मुंबई महापालिकेचे साडेतीन हजार कोटी थकले आहेत. त्यामुळे विकासकामांना खीळ बसली. मग जीएसटीतून मिळणारे पैसे सरकार महापालिकांना कधी देणार आणि जनतेची कामे कधी होणार असा उलट सवाल ठाकरे यांनी केला. 
हिंदूराष्ट्रासाठी भागवतांना पाठिंबा 
राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव पुढे केले, पण आता शरद पवार रिंगणात उतरले आहेत, तेव्हा शिवसेनेची भूमिका काय? यावर महाराष्ट्रा बाहेरील अनेक राज्यांमध्ये राज्यपाल पदावर संघाची विचारधारा असलेले लोक बसले आहेत. हिंदूराष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात आणायची असेल तर खंबीर आणि कणखर नेतृत्व हवे. त्यासाठीच शिवसेनेने मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला तर काय हरकत आहे? असे म्हणत आपण आजही ठाम असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com