ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी, वळसे पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी, वळसे पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारची उद्या (ता. 30) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी आज राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच बहुमताची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल. 

राज्य सरकारने उद्यापासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. गुरुवारी (ता. 28) महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता 3 तारखेच्या अगोदर या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताची चाचणी करताना सत्ताधारी पक्षाकडे हंगामी अध्यक्षपद असावे, यासाठी वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांनी पाच वर्षे विधानसभा अध्यक्षपद भूषवले असल्याने त्यांना कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. विरोधी पक्ष बहुमताची चाचणी गुप्त मतदानाने व्हावी यासाठी आग्रह धरण्याची शक्‍यता असून, विधानसभेत कोणताही घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी दिलीप वळसे पाटील यांची निवड महत्त्वाची मानली जाते. 

अध्यक्षपदाचे अनुभवी वळसे पाटील 
विश्‍वासदर्शक ठरावावर आवाजी मतदानाने अथवा हात वर करून निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतात. त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो. त्यातच कोणत्याही पक्षाच्या प्रतोदाने काढलेल्या पक्षादेशाचे (व्हिप) आमदारांना तंतोतत पालन करावे लागले. एखाद्या आमदाराने व्हिपच्या विरोधात मतदान केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांकडेच असतो. त्यामुळे अशा स्थितीत अनुभव व विधानसभा नियमांची माहिती आवश्‍यक ठरते. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचा हातखंडा असल्याने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

कॉंग्रेससमोर आव्हान 
दरम्यान, विधानसभेत सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. महाआघाडीचे सरकार स्थापन झालेले असले, तरी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारसमोर आव्हान असल्याचे मानले जाते. विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसला देण्याचा निर्णय महाआघाडीच्या बैठकीत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. त्यामुळे कॉंग्रेसला अध्यक्षपदाचा उमेदवार द्यावा लागणार आहे. कॉंग्रेसला मात्र विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्री मिळावे अशी अशा आहे. तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे, अशी नवी मागणी कॉंग्रेसने केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com