गोरे बंधू समोरासमोर आले आणि निर्माण झाला तणाव

Shekhar Gore Jaykumar Gore Came Before Each other and Tension Arised
Shekhar Gore Jaykumar Gore Came Before Each other and Tension Arised

दहिवडी  : सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी निवडीवरून माण तालुक्‍यात रणकंदन माजले आहे. कुळकजाई सोसायटी ठरावावरून आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे हे काल समोरासमोर आल्याने दहिवडी पोलिस ठाण्यात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक होईपर्यंत राजकारण किती गंभीर वळण घेणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. कुळकजाई सोसायटी ठरावावरून आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे हे दहिवडी पोलिस ठाण्यात समोरासमोर आले. या वेळी दोन्ही बाजूचे समर्थकही पोलिस ठाण्यात जमा झाले होते. तणावपूर्ण परिस्थिती बघून पोलिस उपअधीक्षक, पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी, औंधचे पोलिस अधिकारी, निर्भया पथक, दंगल नियंत्रण पोलिसांना पाचारण करण्यात आले. 

या वेळी गोरे बंधूंनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली. सोमवार हा दहिवडीच्या आठवडा बाजाराचा, तसेच शासकीय कामकाजाचा आठवड्याचा पहिला दिवस असतो. मात्र, कुळकजाई सोसायटी ठरावावरून दहिवडी पोलिस ठाणे परिसरात संचारबंदी लागू केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेकांची शासकीय कामे खोळंबली.

याबाबत कुळकजाईच्या विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक सुनंदा कृष्णराव शेडगे यांनी दिलेली तक्रारीनुसार सोसायटीच्या कार्यालयात सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठरावाची प्रक्रिया सुरू असताना सोसायटीचे सचिव संतोष इनामदार यांनी 'ठराव कोणाच्या नावाचा घ्यायचा,' असे विचारले. संचालक आनंदराव पवार यांनी सोसायटीचे सभासद असलेल्या कृष्णराव शेडगे यांचे नाव घेतले. त्यास उपस्थित 12 संचालकांनी उभे राहून हात उंचावत मान्यता दिली. 

''श्री. शेडगे यांना आत बोलविण्यासाठी दरवाजा उघडला असता त्यांच्या पाठीमागून शेखर गोरे, सुनील जाधव, बशीर मुलाणी, अमर कुलकर्णी, राजेंद्र जाधव, आप्पा बुधावले व 20 ते 25 जण सोसायटी कार्यालयात आले. शेखर गोरेंनी ठरावाची प्रक्रिया थांबविण्यास सांगून सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शिंदे, उपाध्यक्ष शामराव पवार व सचिव संतोष इनामदार यांना 'मी सांगेन त्याप्रमाणे ठराव करा,' असे म्हणून दमदाटी करून गाडीत घेऊन निघून गेले. या वेळी आपणाला धक्काबुक्की करण्यात आली. मला व माझे पती कृष्णराव शेडगे यांच्या जीवितास धोका आहे,'' अशी सुनंदा शेडगे यांनी दिली.

सुरेखा आप्पासो बुधावले यांनीही तक्रार दिली. ''सासू-सासरे व दोन मुलांसह घरात झोपलेल्या असताना रात्री एक वाजण्याच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे हे कृष्णराव शेडगे, आनंदराव पवार, सत्यवान कदम व अनोळखी तीन जणांनी घराचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडला असता घरात प्रवेश करून पती 'आप्पा बुधावले कुठे आहे,' अशी विचारणा केली. 'तो माझ्याविरोधात काम करतोय. त्याला समजावून सांगा. विरोधात गेला तर सुटी देणार नाही,' अशी दमदाटी करतानाच 'त्याला कुठं मारून टाकलेलं कळून देणार नाही,' अशी धमकी दिली. त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी 'त्याला सोडायचं नाही' असे म्हणत सर्व जण गाडीतून निघून गेले.'', असे या तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही तक्रारींचा सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.

ठराव दाखल करण्यात शेखर गोरे यशस्वी

आजपर्यंत एकूण 76 पैकी 63 ठराव करण्यात आले असून, अजून 13 ठरावांची प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत होणार आहे. दरम्यान, ज्यावरून एवढे रणकंदन माजले त्या कुळकजाई सोसायटीचा ठराव आपल्या बाजूने करून तो दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल करण्यात शेखर गोरे यशस्वी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com