tense in kagal palika meeting | Sarkarnama

समरजितसिंह घाटगे यांनी मुख्याधिकाऱ्यांचा अवमान केला की नाही? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

भाजपाच्या सर्व नगरसेवकांनीही निषेध ठराव करण्याला एकमुखी विरोध दर्शविला.

कागल (कोल्हापूर) : कागल नगरपरिषदेच्या आज झालेल्या विशेष सभेत म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या निषेधाच्या ठरावावरून सत्तारूढ आणि विरोधी गटात राडा झाला. 

विरोधी भाजपा नगरसेवकांनी असा निषेध ठराव करण्याला जोरदार विरोध केला. त्यावरून शाब्दीक खडाजंगी झाली. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या फेकून मारणे, वादावादी, हमरीतुमरी, मारहाण असे प्रकार घडले. वातावरण तणावपूर्ण बनले. या तप्त वातावरणात भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. कागल नगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची घटना घडली आहे.

कागल नगरपालिकेची विशेष सभा सायंकाळी चार वाजता पालिकेच्या सभागृहात बोलाविण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ माणिक माळी होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष आनंदा पसारे तसेच प्रभारी मुख्याधिकारी होते.

काल गुरूवार ता.12 रोजी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी म्हाडा गृहप्रकल्पाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील उपस्थित होते. त्यांचा समरजितसिंह घाटगे यांनी अवमान केला असे सांगत प्रविण काळबर यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या निषेधाचा ठराव सभेच्या सुरुवातीलाच मांडला. यावर भाजपचे नगरसेवक विशाल पाटील यांनी, असे काही घडले नसल्याने असा ठराव या सभेत मांडता येणार नाही. असे सांगत निषेधाच्या ठरावाला कडाडून विरोध केला. भाजपाच्या सर्व नगरसेवकांनीही निषेध ठराव करण्याला एकमुखी विरोध दर्शविला. त्यातून सतारूढ गटाचे नगरसेवक निषेध ठराव करप्यावर ठाम राहिले. यातून वादावादीला सुरुवात झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यातून पाण्याच्या बाटल्या फेकणे, मारहाण असे प्रकार घडले. या तणावपूर्ण वातावरणात भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग करुन सभागृहाबाहेर पडले. ते पुन्हा सभागृहात आले नाहीत.

त्यानंतर नगराध्यक्षा सौ. माणिक माळी यांनी दहा मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केले. नंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. या सभेत सत्ताधारी गटाकडून सभेपुढील सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली. सभा संपवून सत्तारूढ गटाचे सर्व नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. यावेळी पालिका इमारती बाहेर थांबलेल्या विरोधी नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवकांत वादावादी होऊन मारामारीचा प्रकार पुन्हा घडला. यावेळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर दोन्ही गट तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याकडे गेले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख