Ten detained under MOCCA act in Ulhasnagar | Sarkarnama

उल्हासनगरात 10 गुंडांच्या टोळीला मोक्का

दिनेश गोगी 
शुक्रवार, 21 जून 2019

.

उल्हासनगर :  संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या व विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या उल्हासनगरातील 10 जणांच्या तरुण गुंड टोळीला कल्याण विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी मोक्का लावला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोक्का लावण्याची ही पहिलीच घटना असून या कारवाईने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
मोक्का लावण्यात आलेल्या तरुण गुंडांमध्ये टोळीप्रमुख हरविंदर सिंग ऊर्फ चिक्कू लबाना, हरदीप ऊर्फ हनी लबाना, मॉंटी करोतिया, बिट्टू ठाकूर, शाहीद शेख, अमित रोंदिया, सनी राजोरिया, रोहित भगवाने, अक्षय चव्हाण, युसूफ अन्सारी यांचा समावेश आहे. त्यांचा आणखी एक साथीदार कमल कजानिया हा फरार आहे. या सर्वांवर दरोडा, जबरी चोरी, जीवघेणा हल्ला, दंगा, गंभीर दुखापत, मारामारी, खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांची नोंद आहे. 

पोलिस त्यांच्यावर वारंवार अटकेची कारवाई करतात; मात्र जामिनावर सुटून बाहेर येताच ते पुन्हा संघटितपणे गुन्हे करतात. अलीकडेच या 10 जणांना एका गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या या गैरकृत्याला आळा घालण्यासाठी या 10 जणांवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास उल्हासनगरचे सहायक पोलिस आयुक्त धुला टिळे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे कराळे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख