tell fadnavis keep trust on us says bhujbal | Sarkarnama

`फडणविसांना सांगा, आमच्यावरही भरोसा ठेवा`

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

....

नाशिक : गेल्या काळातील सरकारने चांगले कामं केली. प्रत्येक सरकारचे ते दायित्वच असते. भरोसा सेल सुरू करण्यावर त्यांचा भरोसा आहे. चांगली गोष्ट आहे. पण फडणविसांना सांगा आमच्यावरही भरोसा ठेवा, असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र त्याचवेळी, पोलिसांचे आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारच पैसे देते, पण गेला ना परत त्याचं काय, असा सवाल उपस्थित करीत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या.

नाशिक पोलिस आयुक्तालयात भरोसा सेलचे उद्‌घाटन केल्यानंतर पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलत होते. तत्पूर्वी, या कार्यक्रमात बोलताना आमदार फरांदे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये महिलांच्या सुरक्षितता आणि त्यांचे पूनर्वसन करण्याच्या उद्देशाने भरोसा सेल सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई, पुण्यात हे सेल झाले. नाशिकमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आपण प्रयत्नशील होता, असे सांगितले.

पालकमंत्री भुजबळ यांनी आमदार फरांदे यांच्या भाषणातील फडणवीसांच्या भरोसा सेलवरून सुरवात केली. वाक्‍यावाक्‍यातून कानपिचक्‍या दिल्या. श्री. भुजबळ यांनी, सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार नवनवीन उपक्रम राबविते. फडणवीसांना भरोसा सेल राबविला. पण त्यांना सांगा आमच्यावरही भरोसा ठेवा, असे म्हणत फडणवीसांकडून होणाऱ्या महाआघाडी सरकारवरील सततच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच, सीमेवरच नव्हे तर शहरांमध्येही दहशतवादी कारवाया वाढल्याने त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांचे आधुनिकीकरण करणे आवश्‍यक होते. त्यामुळे तत्कालिन वाजपेयी यांच्या केंद्रशासनाने 75 टक्के निधी पोलिसांवर खर्च करण्यासाठी राज्याला देणे सुरू केले. मात्र, याच सरकारने तो पैसा खर्च न करता परत गेला त्याचे काय, असा प्रश्‍नही श्री. भुजबळ यांनी उपस्थित केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख