बीड जिल्ह्यात नाही एकही कोरोनाग्रस्त : नशिबाची साथ अन॒ प्रशासनही जोमात

बीड जिल्ह्यात आतापर्यंत आठ जणांचे स्वाब तपासले असून सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे यात 'त्या' दुबई रिटर्न पुणेकरांसोबत विमान प्रवास केलेल्या तिघांचा समावेश आहे. कोरोनावर जमावबंदी, संचारबंदी, दुकाने बंदच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा सतर्क दिसत आहे. शंभरावर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
Team of Officers Keeping Beed Safe from Corona
Team of Officers Keeping Beed Safe from Corona

बीड : कोरोनाच्या बाबतीत बीड जिल्हा आतापर्यंत तरी नशिबवानच म्हणावा लागेल. आतापर्यंत तपासणी केलेल्या आठ पैकी सर्वच जणांच्या स्वाबचे वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज घडीला तरी एकही रुग्ण नाही. या विषाणूचा प्रसार गर्दीमुळे होत असल्याने त्यावरील उपाया योजनांसाठी जनता कर्फ्यु, टपरी बंद, दुकाने बंद आणि आता संचारबंदीच्या अंमलबजावणीतही प्रशासन जोमात काम करत असल्याचे चित्र आहे.

टिम लिडर म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावर यांच्या खांद्याला खांदा लाऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांची टीम जोरात बॅटींग करत आहे. त्यांना माहिती अधिकारी किरण वाघ आणि पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी विलास हजारे यांच्याही कामाची दखल घ्यावी लागेल.

दुबईहून परतलेल्या पुण्यातील जोडप्यासह त्यांच्या चालक आणि मुलीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे लक्षात आले आणि राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे याच विमानात बीडच्या तिघांनी प्रवास केला होता. बीडचे प्रशासन तत्काळ हलले आणि या तिघांचे होम क्वारंटाईन करुन त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले. परंतु, तिघांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ जनजागृतीची सुरुवात केली. यावरच न थांबता जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आणि ता. ३१ मार्च पर्यंत टपऱ्याबंदचे आदेश दिले. त्यानंतर पुन्हा दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने आणि अस्थापना बंदचे आदेश दिले. 

आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावर यांनी संचारबंदीही लागू केली. याच्या अंमलबजावणीचा भार पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लिलया पार पाडला. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शंभराहून अधिक जणांवर थेट गुन्हे दाखल झाले. याच काळात जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर त्याचा भंग केल्याचेही गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सिंचन नसल्याने शेती कोरडवाहू आहे, उद्योगाचे साधने नाहीत त्यामुळे पुणे - मुंबईला गेलेल्यांची संख्या मोठी आहे. या दोन्ही शहरांत वाढलेली भिती आणि बंदीच्या पार्श्वभूमीवर या मंडळींनी जिल्ह्याचा रस्ता धरला. 

जिल्ह्यात येणाऱ्या मार्गांवर स्क्रिनींगची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पेलत आतापर्यंत साधारण ४० हजारांवर लोकांची प्राथमिक  तपासणी केली आहे. सद्यस्थितीत अद्याप एकही रुग्ण विलगीकरण कक्षात नसला तरी भविष्यात काही गरज पडली तर जिल्हाभरात असे कक्ष उभारण्याच्या कामासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी उडी घेत हे काम नेटाने पार पाडले. बीड शहरासह काही ठिकाणी अलगीकरण कक्ष उभारले असून काहींची उभारणीचे काम वेगात सुरु आहे. 

दरम्यान, परदेशातून आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांच्या नोंदी घेणे, त्यांची प्राथमिक तपासणी करण्याचे काम ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या शिरावर असून यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनीही आघाडी घेत आतापर्यंत गावागावांत अशांच्या नोंदी आणि त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के यंत्रणेमार्फत मारुन घेतले आहेत.

दरम्यान, ही टीम जोमाने लढत असताना प्रशासनाचे झालेले निर्णय, करावयाच्या उपाय योजना, प्रमुख अधिकाऱ्यांचे आवाहन - सुचना माध्यमांपर्यंत तितक्याच जलदगतीने पोचविण्याचे काम आतापर्यंत माहिती अधिकारी किरण वाघ जोमाने करत आहेत. तर, पोलिसांच्या कारवायाची माहिती तेवढ्याच जोमाने विलास हजारे व्हायरल करत आहेत. एकूणच जिल्ह्याच्या नशिबाने आजघडीला तरी एकही रुग्ण नाही आणि भविष्यातही कोणी नसावा यासाठी ही टीम तेवढ्याच जोमाने काम करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com