tanpure karkhana | Sarkarnama

जिल्हा बॅंकेकडून राहुरीत तनपुरे कारखान्याच्या जप्तीचा फार्स

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

कारखाना जप्तीचे प्रयत्न मागील चार वर्षांपासून सुरू होते. सभासद, कामगार व संचालक मंडळाच्या विरोधामुळे पाच-सहा वेळा ही कारवाई पुढे ढकलली. दरम्यान मागील वर्षभरात डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा कारखाना चालविण्यास घेतला. डॉ. विखे पाटील काही तरी उपाययोजना करून कारखाना वाचवितील. कामगारांना पुन्हा काम मिळेल, अशी आशा ऊस उत्पादक, कामगारांना होती. कारखान्याचे मागील दोन गाळपही झाले नाही. बंद स्थितीत ठेवून मार्ग काढण्याचे नियोजन विखे पाटील यांनी केले. त्याचाच भाग म्हणून जप्तीची ही कारवाई समजली जाते. 

नगर  : राहुरीमधल्या डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर थकीत असलेल्या 88 कोटीसाठी जिल्हा बॅंकेने जप्तीची कारवाई केली. हा कारखाना विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी चालविण्यास घेतला आहे. यापूर्वी चार-पाच वेळा जप्तीची कारवाई टाळली. अखेर सोमवारी संपूर्ण कारखाना जिल्हा बॅंकेने जप्त केला. असे असले, तरी हा केवळ फार्स ठरणार आहे. कर्ज पुनर्गठणासाठी मार्ग सुकर व्हावा, यासाठी केलेली ही सोय आहे, हे सहकारातील जाणकारांना स्पष्ट दिसते. 

राहुरीतील डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना मशिनरी सह सर्व चल, अचल मालमत्ता जप्त करून, नगर जिल्हा बॅंकेच्या ताब्यात देण्यात आली. बॅंकेच्या सुमारे 88 कोटी रुपये थकीत कर्जापोटी "सिक्‍युटिरायझेशन ऍक्‍ट' नुसार राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी कारवाई केली. सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसीलदार व बॅंकेचे पथक कारखान्यावर आले. बॅंक व कारखान्याच्या समन्वयाने कारवाई झाल्याने, जप्तीला विरोध झाला नाही. कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रेय मरकड यांनी जप्तीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. पंचनामा करून पथकाने कारखाना मालमत्तेचा ताबा घेतला. कारखान्याची मशिनरी, सर्व गोदाम, केंद्रीय कार्यालय इमारत, आसवनी प्रकल्प, पेपरमिल व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत, कामगार वसाहत, अतिथिगृह, मंगल कार्यालय इमारत, खुले नाट्यगृह, पेट्रोल पंप, केन यार्ड, कारखाना मालकीची सर्व वाहने तसेच बॅंकेकडे तारण असलेल्या चिंचविहिरे व देवळाली प्रवरा शिवारातील जमिनी जप्त करण्यात आल्या. 
चार वर्षांपासून प्रयत्न 
कारखाना जप्तीचे प्रयत्न मागील चार वर्षांपासून सुरू होते. सभासद, कामगार व संचालक मंडळाच्या विरोधामुळे पाच-सहा वेळा ही कारवाई पुढे ढकलली. दरम्यान मागील वर्षभरात डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा कारखाना चालविण्यास घेतला. डॉ. विखे पाटील काही तरी उपाययोजना करून कारखाना वाचवितील. कामगारांना पुन्हा काम मिळेल, अशी आशा ऊस उत्पादक, कामगारांना होती. कारखान्याचे मागील दोन गाळपही झाले नाही. बंद स्थितीत ठेवून मार्ग काढण्याचे नियोजन विखे पाटील यांनी केले. त्याचाच भाग म्हणून जप्तीची ही कारवाई समजली जाते. कारखाना मुख्य प्रवेशद्वार व केंद्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जप्तीचे फलक लावण्यात आले. 
आमदार शिवाजी कर्डिलेंचे साह्य 
युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे आल्यापासून, कर्ज पुनर्गठनासाठी आटोकाट प्रयत्न सुरु झाले. राज्य सहकारी बॅंकेने नाशिक जिल्ह्यातील वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या थकीत कर्जाचे दोन वर्षापूर्वी पुनर्गठन केले. तसाच प्रस्ताव तनपुरे कारखान्याने जिल्हा बॅंकेसमोर ठेवला आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पुढाकाराने बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळाने नुकताच कर्ज पुनर्गठनास हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे, कायद्यानुसार अटळ असलेली कारखाना जप्तीची प्रक्रिया सुकर झाली. 
मालमत्ता पुन्हा मिळेल 
कारखाना जप्त केला असला, तरी ऊस उत्पादकांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेला खुलासा दिलासादायक आहे. थकीत कर्ज पुनर्गठन करून, दहा हप्ते करावेत. असा प्रस्ताव बॅंकेसमोर ठेवला आहे. बॅंकेच्या येत्या संचालक मंडळाच्या सभेत पुनर्गठनाचा विषय घेतला जाईल. बॅंकेच्या अटी व शर्तींनुसार त्यांची रक्कम प्राधान्याने द्यावी लागेल. पुनर्गठन होताच, हंगाम सुरू करण्यासाठी बॅंकेतर्फे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या ताब्यात जप्त केलेली मालमत्ता सुपुर्द केली जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख