Tanishqa prepared themselves to lead the society | Sarkarnama

तनिष्कांनी सक्षमपणे स्वीकारला नेतृत्वविकासाचा वसा मुंबई अधिवेशनातून मिळाले लोकसेवेचे संचित

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

तनिष्कांच्या नेतृत्वविकास कार्यक्र​मांतर्गत झालेल्या निवड​णु​​कीनंतर पुढचा टप्पा म्हणून आयोजित केलेल्या या अधिवेशनातून ​या तनिष्कांना लोकसेवेचे संचित मिळावे, असा प्रयत्न होता. ​दोनदिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या या अनुभवामुळे तनिष्का सुखावल्या होत्या. त्यातून काही तनिष्कांनी आपण आपल्या परिसरात घडविलेल्या बदलाचे अनुभव सांगितल्याने ​प्रत्येकीच्या मनात आपणही असेच काही घडवावे अशी जिद्द जागली होती.

​मुंबई : ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाने, राज्यभरातील दुर्गांमधल्या, स्त्री प्रतिष्ठा अभियानाद्वारे जागवलेल्या ‘शक्ती’ची प्रचिती मुंबईत आली. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात तनिष्कांच्या दोनदिवसीय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील गृहिणींपासून डाॅक्टरपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून परिचारिकांपर्यंत सर्व थरांतील महिला स्वतःमधल्या क्षमतांच्या, नेतृत्वगुणांच्या आणि उद्योगांच्या विकासासाठी एकत्र आल्या होत्या. राज्यभरातील तनिष्कांमधून निवडून आलेल्या या प्रतिनिधींनी बुधवारी (ता. १९) तज्ज्ञ, अधिकारी आणि उद्योजकांकडून घेतलेल्या कानमंत्रानंतर अधिक कार्यक्षमतेने महा‘राष्ट्र’ उभारणीचा निर्धार केला.

ठिकठिकाणी काढलेल्या रांगोळ्या, तनिष्कांना नजरेसमोर ठेवून केलेली सजावट​, त्यांच्या यशस्वी वाटचालीचा मांडलेला आलेख​ आणि कार्यक्रमस्थळी​ असलेली उत्तम व्यवस्था यामुळे मुंबईत प्रथमच आलेल्या तनिष्का भारावून​ ​गेल्या होत्या. त्यावर कळस चढवला तो त्यांना मिळालेल्या बहुअंगी, सक्षम मार्गदर्शनाने.

‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी तनिष्कांशी साधलेल्या मनमोकळ्या संवादानंतर​, एलिफंटा डिझाइन्सच्या अश्विनी देशपांडे, ​ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पोलिस उपायुक्त प्रज्ञा सरोदे, लोकसहभागातून दुष्काळाला दूर करण्याचे धडे देणारे राजेंद्र होलानी,​ ​नगरविकासच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी मान्यवरांनी तनिष्कांना आपले अनुभव सांगत समृद्ध केले.​

तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी तनिष्कांनी केलेल्या अजोड कार्याबद्दल त्यांचे कौतुक करतानाच त्यावर​ ​लोकमान्यतेची मोहर उमटत असल्याचेही सांगितले. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी​ ​अधिकारी प्रदीप ​द्वि​वेदी यांनी तनिष्कांच्या क्षमतावर्धनासाठी होणारे प्रयत्न​ ​निरंतर सु​रू ​रा​हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तनिष्कांच्या नेतृत्वविकास कार्यक्र​मांतर्गत झालेल्या निवड​णु​​कीनंतर पुढचा टप्पा म्हणून आयोजित केलेल्या या अधिवेशनातून ​या तनिष्कांना लोकसेवेचे संचित मिळावे, असा प्रयत्न होता. ​दोनदिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या या अनुभवामुळे तनिष्का सुखावल्या होत्या. त्यातून काही तनिष्कांनी आपण आपल्या परिसरात घडविलेल्या बदलाचे अनुभव सांगितल्याने ​प्रत्येकीच्या मनात आपणही असेच काही घडवावे अशी जिद्द जागली होती. त्यासाठी उपयुक्त ठरणार होते ते त्यांना या अधिवेशनातून मिळालेले संचित !​

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख