गेवराईतून बदामराव पंडितांसाठी तानाजी सावंतांचा जोर

तीन वर्षांपूर्वी बदामराव पंडित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाला जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा मिळाला तर गेवराई पंचायत समितीचीही सत्ता मिळाली. त्यावेळी माजी मंत्री हे बिरुद असलेले ते शिवसेनेतील एकमेव नेते होते. शिवसेना भाजप युती तुटली.
Badamrao-pandit-Sawant
Badamrao-pandit-Sawant

बीड : युतीत गेवराईची जागा विद्यमान भाजप आमदारांमुळे भाजपलाच मिळेल, अशी चर्चा सुरु असतानाच मंत्री तानाजी सावंत यांनी बदामराव पंडित यांच्यासाठी लावलेला जोर आणि पंडितांची मुंबई वारे यामुळे आता नवीन ट्विस्ट होत आहे. या जागेवरुनही ओढाताण निर्माण होण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी माजी मंत्री असे बिरुद लावलेले ते शिवसेनेतील एकमेव नेते होते. ग्राऊंड पातळीवर कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यामागे आहेच.  दरम्यान, त्या काळात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गेवराई मतदार संघात शिवसेनेने सर्वाधिक चार जागा मिळाल्या.

जिल्हा परिषदेतील चारही सदस्य फक्त त्यांचेच समर्थक आहेत. तर, गेवराई पंचायत समितीवरही शिवसेनेला सत्ता मिळाली. दरम्यान, त्यावेळी भाजप - सेनेची युती नव्हती. परंतु, त्यांच्या प्रवेशावेळी ‘जर युती झाली तर गेवराईची जागा शिवसेनेला सुटली तरच युती’ असा शब्द त्यांना वरिष्ठांनी दिला होता अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होती. नंतर पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले आणि जयदत्त क्षीरसागर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

त्यामुळे एकमेव बीडची पूर्वीपासूनची जागाच शिवसेनेला राहील आणि गेवराईतून भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनाच उमेदवारी मिळेल असे चित्र निर्माण झाले. अगदी महाजनादेश यात्रेच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यावर जणू शिक्कामोर्तबच केले.

परंतु, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत वजन असलेल्या आणि बदामराव पंडितांना शिवसेनेत घेणाऱ्या तानाजी सावंतांनी गेवराईच्या जागेसाठी आग्रह धरल्याची माहिती आहे. त्यातच बदामराव पंडित यांनी  दोन दिवस मुंबईत ठोकलेल्या मुक्कामामुळे याला अधिक पुष्टी मिळत आहे. 

तसे, पुर्वीपासून समर्थक राहीलेल्या बदामराव पंडित यांना उमेदवारी मिळावी असे जयदत्त क्षीरसागर यांनाही वाटत आहे. 

परंतु, त्यांनी अद्याप आपले पत्ते खुले केले नाहीत. मात्र, सावंत यांनी या जागेसाठी जोर लावल्याची माहिती असल्याने गेवराईच्या शिवसैनिकांच्या आशा दुणावल्या आहेत. मात्र, विद्यमान आमदार असताना जागेची अदलाबदल शक्य होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com