प्रा. तानाजी सावंत उस्मानाबादचे नवे पालकमंत्री

 प्रा. तानाजी सावंत उस्मानाबादचे नवे पालकमंत्री

उस्मानाबाद : राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची अपेक्षेप्रमाणे उस्मानाबादचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सावंत पालकमंत्री होणार याची चर्चा व पोस्टर जिल्ह्यात लागली होती. आता सावंत हे जिल्ह्याचे चौथे पालकमंत्री ठरले आहेत. राज्यातील नव्या मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्यातील वजनदार समजले जाणारे शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते प्रा. तानाजी सावंत यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सावंत यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे जलसंधारण विभागाचा कारभार सोपवण्यात आला होता. 

उस्मानाबाद जिल्ह्याकडे मंत्रीपद नसल्याने गेली साडेचार वर्ष जिल्ह्याला बाहेरून आलेले पालकमंत्री देण्यात आले होते. सर्वात आधी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकत्व होते. परंतु त्यांचा ग्रामीण भागाशी फारसा संबंध नव्हता. जिल्ह्याला अगदी कमी वेळ दिल्यामुळे सावंत आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आपुलकीचे संबंधच निर्माण झाले नाही. डॉ. सावंत यांच्या सरळ स्वभावाचा लाभ इतर पक्षातील नेत्यांनीच त्यांच्यासोबत राहून करून घेतला. त्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्ते नाराज त्यांच्यावर नाराज होते. सेना पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरूनच सावंत यांना पायउतार व्हावे लागले होते असे बोलले जाते. 

सावंत यांच्या नंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले. मात्र त्यांच्यांशी देखील स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांचे जमले नाही. वर्षभरातच त्यांना देखील हटवण्यात आले. रावते यांच्यानंतर पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मस्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतु स्वःताचा जालना मतदारसंघ सांभाळून त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यासाठी फारसा वेळ देणे शक्‍य झाले नाही. प्रा. तानाजी सावंत यांचा पर्याय उपलब्ध होताच शिवसेनेने अर्जून खोतकर यांच्या जागी सावंत यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

याआधी जिल्ह्याला बाहेरचे पालकमंत्री लाभल्याने त्यांचा दौरा क्वचितच व्हायचा. नियोजन समितीची बैठक अथवा ध्वजवंदनाचा कार्यक्रम असेल तेव्हाच तिन्ही पालकमंत्री जिल्ह्यात यायचे. त्यामुळे त्यांची ओळख केवळ झेंडावंदन मंत्री म्हणूनच जिल्ह्याला होती. तानाजी सावंत यांच्या रुपाने जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री मिळाला असला तरी उर्वरित दोन महिन्यात जिल्ह्यातील कोणत्या कामांना ते प्राधान्य देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com