उद्धव ठाकरेंनी अद्याप तानाजी सावंत यांना माफ केलेलेच नाही ...

उद्धव ठाकरेंनी अद्याप तानाजी सावंत यांना माफ केलेलेच नाही ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख व उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांचे मातोश्री बिघडलेले संबंध पुन्हा सुधारण्याची शक्‍यता आता दुरावली आहे . मुलासह सामुहिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित रहावे अशी विनंती करत प्राध्यापक तानाजी सावंत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन निमंत्रण दिले होते. त्यामुळे सावंत यांच्याबद्दलची नाराजी दूर होऊन उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा पक्षात मानाचे स्थान देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण उद्धव ठाकरे यांनी सावंत यांच्या मुलासह सामुहिक विवाह सोहळ्याला अनुपस्थित राहत आपण सावंत यांना अद्यापही माफ केले नसल्याचे दाखवून दिले आहे. 

लोकसभेच्या आणि विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी घवघवीत यश मिळवत जिल्ह्यातील आपले वर्चस्व सिद्ध केले होते. शिवसेनेकडून देखील उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना झुकते माप देत दोन जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख पद, उपनेते व विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देत विश्वास दाखवला होता. युतीच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असताना धरण खेकड्यांनी फोडले असे वादग्रस्त विधान करत पक्षाला अडचणीत आणल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना सावरून घेतले होते. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सावंत यांना मंत्री मंडळात पुन्हा स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. 

परंतु महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी सावंत यांच्या नावावर फुली मारली आणि तिथूनच सावंत- ठाकरे यांचे संबंध बिघडले. मंत्रिमंडळात डावल्यामुळे संतापलेल्या सावंत यांनी थेट मातोश्री गाठत आपली नाराजी जाहीर केली होती. यापुढे आपण मातोश्रीची पायरी चढणार नाही असे सांगत निघालेल्या सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी देखील जय महाराष्ट्र असे म्हणत सूचक इशारा दिला होता. सावंत यांनी त्यानंतर मातोश्रीची पायरी चढली नव्हती. उलट पक्षात राहून भाजपशी हातमिळवणी करत जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतली . 

शिवसेना नेतृत्वावर दबाव वाढविण्याचा सावंत यांचा हा प्रयत्न देखील यशस्वी ठरला नाही. त्यानंतर अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या चिरंजीवांच्या विवाहसह परंडा तालुक्‍यातील सोनरी येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी तानाजी सावंत पुन्हा एकदा मातोश्रीची पायरी चढले. 

भाजपशी जवळीक भोवणार 
दरम्यान, दोन महिन्यापासून गप्प बसलेल्या सावंत यांनी प्रथमच आपल्या नाराजीबद्दल प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट केली. मी नाराज आहे हे मीडियाने उठवलेली हूल असल्याचे सांगत उद्धव ठाकरे फार काळ उस्मानाबाद जिल्ह्यावर अन्याय करणार नाहीत असे सावंत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सावंत यांना पुन्हा शिवसेना दरबारी रूजू करून घेतले जाईल असे चित्र निर्माण झाले होते. परंतु सावंत यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळयांना दरवर्षी आवर्जून हजेरी लावणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मात्र पाठ फिरवली. अर्थात यामागे सावंत यांच्याबद्दलची नाराजी हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका, भाजपच्या नेत्यांशी वाढती जवळीक यामुळे उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना आणखी दूर लोटल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. आता सावंत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com