तमाशा कलावंत झाला पोलिस फौजदार; राहुटीत गिरवले धडे

तमाशात डान्सर म्हणून कधी काळी काम करणार दिनेश सरट फौजदार झाला आहे. एका नर्तिकेच्या मुलाने मिळवलेले हे यश लक्षणीय आहे. संघर्ष केला की यश मिळते, याचे उत्तम उदहारण दिनेश याने घालून दिले आहे.
दिनेश सकट
दिनेश सकट

टाकळी हाजी :  तमाशाच्या राहुटीतच जन्म झाल्याने शिक्षणाचा श्रीगणेशा येथूनच झाला. नृत्यागंणा कलाकार म्हणून आईने केलेले कष्ट, शाळेची सुट्टी झाली की रंगमचावर नृत्यअविष्कार करायचा, जनतेच्या मनोरंजनासाठी वाद्यकाम करत सोंगाड्या व्हायचं. यामधून अपार कष्ट करत शिक्षण पूर्ण करून आईचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सविंदणे ( ता. शिरूर ) येथील दिनेश मधुकर सकट हा तमाशा कलावंत आता फौजदार झाला आहे. 


आई तमाशा कलावंत नंदा सकट या नृत्यागंणा म्हणून काम करत होत्या. गरीबीची परीस्थीती त्यातून तमाशा कलावंत म्हणून आठ महिण्याच्या तमाशात रोजदारी मिळवत काम करायचे. त्यामुळे दिनेशचा जन्म देखील तमाशाच्या राहुटीत झाला. शिक्षणाची आवड व आईची शिक्षणावरची आस्था यामुळे ति नेहमी शिक्षणाचा आग्रह धरत होती. त्यातून दिनेश 2009-2010 मध्ये बारावी उत्तीर्ण झाला. या काळात आईला मदत म्हणून तो तमाशात डान्सर , वादयकाम, सोंगाटया अशा भूमिका करू लागला. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, दत्ता महाडिक पुणेकर, सर्जेराव जाधव या मोठ्या तमाशात तो काम करत होता.

तमाशात काम करता करता त्याने पाबळ ( ता. शिरूर ) येथे बी. कॅाम पर्यतची पदवी मिळवली. पदवी पर्यंतचा त्याचा शिक्षणाचा प्रवास अतीशय खडतर राहिला. त्यात त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. 2016 मध्ये आई नंदा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने या कुटूंबावर मोठे संकट कोसळले. तमाशामध्ये काम न करता मोठा अधिकारी व्हावे ही आईची इच्छा होती.

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. पुण्यातील काही मित्रांनी यासाठी त्यांना मदत केली. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना प्रंचड ईच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक बनला आहे.

तमाशा कलावंत म्हटल्यावर जनतेच्या मनोरंजनासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. त्यातून तमाशा फडांना आलेली उतरती कळा यामुळे तमाशा कलावंताना देखील त्याचा फटका बसलेला पहावयास मिळतो. अशा परीस्थीतीत त्याने शिक्षणाच्या जोरावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. ही तमाशा कलावंतासाठी गौरवणीय बाब असल्याचे तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

तमाशा कलावंत म्हणून जनतेची सेवा करून त्यांचे मनोरंजन केले. कला सादर करताना जीवनात अऩेक बरेवाईट अनुभव आले. त्यातून मार्ग काढून आईच्या कष्टाचा आशिर्वाद सोबत असल्यानेच तिचे स्वप्न पुर्ण करू शकलो. अधिकारी पदाचा वापर देखील योग्य पद्धतीने करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे दिनेश सकट याने सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com