बेरोजगारांच्या ललाटी आता तलाठ्यांची 'पाटी' - Talathi recruitment soon | Politics Marathi News - Sarkarnama

बेरोजगारांच्या ललाटी आता तलाठ्यांची 'पाटी'

संजय मिस्कीन 
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

राज्यात लवकरच दोन हजार तलाठ्यांची भरती सुरू होणार आहे.

मुंबई  : केंद्र व राज्य सरकारच्या नोकरभरतीवर बेरोजगांरामध्ये कमालीचा असंतोष सुरू असताना राज्यात लवकरच दोन हजार तलाठ्यांची भरती सुरू होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारांना खूश करण्यासाठी महाभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

 22 प्रकारच्या संवर्गातील भरतीत तलाठी या संवर्गाची सर्वाधिक पदे असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. या तलाठी भरतीच्या फाईलला अंतिम मंजुरी मिळाली असून, आठवडाभरात याबाबतची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

तलाठी पदभरतीची प्रक्रिया या वेळी जिल्हा निवड समितीमार्फत राबविण्यात येणार नाही. यासाठी राज्यात एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 200 गुणांची असून, 100 प्रश्‍न असतील. यासाठी मराठी, इंग्रजी, अंकगणित व सामान्यज्ञान या विषयावर प्रश्‍न असतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पदांचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. 

त्यानुसार उमेदवाराला कोणत्याही एकाच जिल्ह्याचा प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. ज्या जिल्ह्याचा प्राधान्यक्रम दिला आहे त्याच जिल्ह्यात गुणवत्ता यादीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल. या परीक्षेची सर्व जबाबदारी "महापरीक्षा-ऑनलाइन' या सरकारच्या अधिकृत यंत्रणेवर सोपवण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा लागणार असून, परीक्षादेखील ऑनलाइनच होणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख