take precautions of electronic appliances today at 9 PM in corona lockdown | Sarkarnama

तुम्ही मोदी समर्थक असा की विरोधक : रात्री नऊ वाजता घरातील वीज उपकरणांची अशी काळजी घ्या!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 5 एप्रिल 2020

लाॅकडाऊनमध्ये वीज दिवे बंद करण्याचे नक्की काय परिणाम होतील, यावर बरीच मते व्यक्त होत आहेत. तरी आपल्या घरातील उपकरणांची काळजी घेणे आपल्या हाती आहे. 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (पाच एप्रिल रोजी) रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी घरातील विजेवर चालणारे दिवे बंद करून कोरोनाच्या लढाईत मनोधैर्य वाढविण्याचे आवाहन करण्यावरून देशात राजकीय टिप्पण्या जरी होत असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून सामान्य माणसाने आपल्या घरातील वीज उपकरणे सुस्थितीत राहतील, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

नऊ मिनिटांसाठी फक्त दिवे बंद केल्याने वीज यंत्रणेवर काहीच ताण येणार नाही यापासून ते थेट देशाचे वीजपुरवठा करणारे जाळे (ग्रीड) धोक्यात येऊ शकते, अशा दोन्ही बाजूंच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

लोड डिस्पॅच सेंटरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की देशात सध्या रात्री नऊ वाजताची वीज मागणी ही सव्वा लाख मेगावाॅटच्या दरम्यान आहे. देशात सर्वांनीच (फक्त) दिवे बंद केले तर या मागणीत अचानकपणे तेरा ते पंधरा टक्क्यांची घट होईल. त्यानुसार 15 ते 17 हजार मेगावाॅटने विजेची मागणी कमी होईल, असा अंदाज गृहित धरला आहे. आठ ते दहा टक्क्यांचा (वाढ किंवा घट) धक्का सहन करण्याची ताकद सिस्टिममध्ये आहे. त्यापेक्षा वाढीव धक्क्याला सहन करण्यासाठी सर्व राज्यांच्या लोड डिस्पॅच सेंटरला काळजी घेण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार काही ठिकाणी सायंकाळी सहा वाजल्यपासूनच लोड शेडिंग सुरू करण्यात येणार आहे. जलविद्युत प्रकल्प रेड मोडवर ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात कोयना जलविद्युत प्रकल्पातून 1960 मेगावाॅट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. सर्वांनीच ठिक नऊ वाजता दिवे बंद करू नयेत. त्या आधी काही मिनिटे बंद केले तरी चालतील आणि सुरू करतानाही रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनंतर अचानकपणे सुरू करण्याऐवजी विलंबाने सुरू करावेत, असे आवाहन लोड डिस्पॅच सेंटरच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

वीज यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी काळजी घेतली असली तरी या साऱ्या परिस्थितीत मागणीत घट झाल्याने अचानक हाय व्होल्टेजचा धक्का घरगुती उपकरणांनाही बसू शकतो. त्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील वीज उपकरणांची काळजी घ्यावी, असे आवाहन वीज क्षेत्रातील तज्ज्ञ राजाराम शिंदे यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी काही टिप्स दिल्या आहेत. टिव्हिसारखी उपकरणे व्लोल्टेज सेनसेटिव्ह असतात. अशा उपकरणांत काही बिघाड समजा झालाच तर सध्याच्या लाॅक डाऊनच्या परिस्थितीत ते दुरूस्त करता येणे सहज शक्य नाही. त्यामुळे आधीच काळजी घ्यावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ज्यांना मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा आहे त्यांनी

1)घरातील सर्व उपकरणांचे स्वीच बंद करावेत. (पंखे वगळता)
2)पंखा हा कमी वेगावर म्हणजे एक किंवा दोनच्या सेटिंगवर ठेवावा.
3)रात्री नऊला पाच मिनिटे कमी असतानाच मेन स्वीच बंद करावा.
4)नऊ वाजल्यापासून मोदींच्या आवाहनानुसार मातीचे दिवे, मोबाईल टाॅर्चे लावावा.
5)नऊ वाजून नऊ मिनिटे झाल्यानंतर लगेच स्वीच आॅन करू नयेत. थोडा वेळ वाट पाहावी. पाच ते दहा मिनिटांनंतर (योग् वेळ म्हणजे नऊ वाजून वीस मिनिटांनंतर) उपकरणे सुरू करावीत.
6)टिव्हीसारखे उपकरण सर्वात शेवटी सुरू करावे.
7)सध्या वापरात असलेले एलईडी दिवे पण जास्त व्होल्टेज सेन्सेटिव्ह असतात. त्यामुळे जुन्या पद्धतीचे बल्ब (40 वॅट) पंख्यासोबत सुरवातील लावले तरी चालतील.
8)ज्यांच्याकडे व्होल्टेज रेग्युलेटर आहे. त्यांनी फार काळजी करण्याचे कारण नाही.

ज्यांना मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद न देता विजेवरील दिवे आणि इतर उपकरणे सुरूच ठेवायची आहेत त्यांनीही फॅन आणि जुन्या पद्धतीचे बल्ब सुरू ठेवावेत. फॅनचा स्पीड अचानक वाढत असेल तर हाय व्होल्टेज आहे, असे समजा. मोदी यांच्या योजनेला विरोध असणाऱ्यांनीही रात्री 9.20 नंतरच टिव्ही चालू करावा, अशी सूचना शिंदे यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख